महापूर, 31 जुलै 1991
- RGDian
- Jan 15, 2021
- 12 min read
Updated: Aug 1, 2021
कुत्र्यानं उलटी टांग करून मुतावं तसा अंगणात पाणी शिंपडल्यासारखा पाऊस झाला आणि नंतर मृग नक्षत्र सरून पंधरा दिवस लोटले तरी पावसाचा पत्ताच नव्हता. कधी आभाळ भरून यायचं तर कधी हवेमुळे भरून आलेलं आभाळंही फारकून जायचं. पण पाणी मात्र पडायचं नाही.
पाण्यामुळे पेरण्या खोळंबल्या होत्या. मात्र काहींनी घुळपेरणी करून टाकली होती. शेतकरी मंडळी पाण्याच्या या अशा अकातामुळे सारी मनातल्या मनात पस्तावत होती. मान त्त्यात अडकल्यावानी झालेली, त्यामुळे मनची व्यथा कोणाजवळ बोलताही येत नव्हती. हवालदिल झालेला गाव पाण्याची चातकासारखी वाट पाहू लागला. आकाशाकडे आशेने डोळे लावून बसला. आकाशातील ढग नुस्तेच शिवाशिवीचा खेळ खेळण्यात दंग झालेले. कधी रात्री बेरात्री बेधुंद वारा सुटायचा. कोरडे ढग अंगाचा तीळपापड करीत नुसतीच ठणठण करीत राहायचे.
निसर्गाच्या लहरीपणाला कंटाळून कर्ती धर्ती माणसं पायात मान घालून बसून होती. एकदुस-याशी
पाण्यापावसाच्या...सुखापेक्षा दु:खाच्याच गोष्टी करून दिवस ढकलत होती. म्हातारी कोतारी माणसं आभाळाला हात जोडून विणवणी करीत होती.
आपल्या पतीला मृत्यूच्या (यमाच्या) कराल दाढेतून खेचून आणणा-या सावित्रीची कथा सांगत वटपौर्णिमा सरली आणि पावसाला सुरूवात झाली. सुरूवाती सुरूवातीला पाण्याबरोबर गराडही होतं. गराडानं शिवारातील झाडंझूडपं बोंडीबुची केली तर गावात हैदोस घालून घरांचे टीनपाखेही उडवून नेले.
कोणं पाण्यापासून बचाव म्हणून झडप बांधून केलेली सोय अर्ध्यावरच ठेवून गराड घेऊन गेलं. या गराडामुळे व आभाळाच्या गडगडाटामुळे एकाची गोष्ट दुस-याला धड समजत नव्हती.पावसाचा वेग वाढला तसा गराडाचा कमी झाला. पाण्यानं अवघा मुलूख धुऊन काढला.
चार दिवस झाले तरी धार खंडेना. मे च्या रखरखत्या उन्हामुळे भेगाळलेल्या..., तहानलेल्या जमिनीत पाणी मुरू लागलं. चौथ्या दिवशी जमिनीची तहान पूर्ण झाल्यासारखी वाटली. पावसाचं पडणारं पाणी आता कुठं स्वतःचा मार्ग स्वतःच तयार करून पुढं सरकत होतं. या चार दिवसात मात्र कोणी चिटपाखरूही घराबाहेर पडलं नव्हतं. संततधार पावसामुळे बाहेर लोटा घेऊन जाण्याची सोयही उरली नव्हतं. दिवसरात्र पावसाच्या धारेत चेचरलेलं गाव हातपाय आखडून धार खंडण्याची वाट पाहत बसून राहिलं. घरातल्या घरात जग-यापाशी नव्या जुन्या गोष्टी उगाळत वेळ दवडू लागलं.
दुसऱ्या दिवशी सकाळी पाण्याची धार खंडली. आकाशात सूर्यनारायण दिसू लागला. त्याची कोवळी चिवळी किरणं आपल्या स्पर्शानं भूईच्या अंगाखांद्यावर गोड शहारे उमटवू लागली होती. पावसाच्या पाण्यात न्हालेला परिसर पिवळसर उन्हात आणखीच खुलून दिसत होता.
पाण्याच्या धारेमुळे आतापर्यंत हातपाय आखडून मातीच्या पेंडावानी चुलीजवळ बसलेलं गाव घराबाहेर डोकावू लागलं होतं. पावसाच्या येण्यानं आनंदीत झालं होतं. कोणी नदीकाठानं तर कोणी वावर शिवारातून चक्कर मारून येऊ लागलं. पेरणीचे अंदाज आडाखे मनाशी बांधून तयारीला लागलं. जांभुळवाह्या आटपून पेरणीच्या तासावर उभं झालं
पोटभर पाणी पिऊन सुस्त झालेल्या भूईच्या पोटात टाकलेलं बी मातीच्या ढेकळाआडून डोकं वर काढून पाहू लागल. पडीक जमिनीही अंकुरू लागल्या. पिवळट हिरवट दिसणाऱ्या लुसलुसत्या कोंबानं भूई सजू लागली. अधूनमधून येणाऱ्या पावसामुळे पीक जोमानं वाढत होतं. सर्व आपआपल्या कामात गुंतले होते.
औंदा लग्न होऊन सासरी गेलेल्या लेकीबाळी आखाडीच्या सणाला माहेरी येऊ लागल्या होत्या. शेतकरी, शेतमजूर, बायाबापडे शिवारातलं हिरवं पीक पाहून आनंदत होतं.
आखाडी सरली आणि पावसाला सुरूवात आली. झुत्यटच च सुरू झालेला पाऊस सकाळी अकाक वाजता सुट्टी घेतल्या सारखा खंडला. पावसाच्या पाण्यानं रस्ते गिचडगाचड झालले. रस्त्यावर जागोजागी पाण्याची डबकी थांबलेली.
घरातून डोक बाहेर काढून काही पाण्याची डबकी चुकवत गिचडगाचड रस्त्यावरून एकमेकांना भेटून खबरबात घेऊन आले. काहींनी शेतीवाडीकडे चक्कर मारून मन मोकळं केलेलं. तर काहींनी गुरांचे हातपाय मोकळे करून आणले. पिवळट उन्हात भूई कात टाकलेल्या सापावानी नवथर दिसत होती.
अर्धा दिवस पावसानं उघाड दिली खरी पण आवतन दिल्यासारखा तो पुन्हा सुरू झाला. पावसाची रिपरिप बाजूला पडून झडी लागल्यावानी बरसू लागला. थेंबाचा आकार बदलला आणि जोर वाढला. पाऊस सारखा बरसत राहिला.
पावसाच्या अशा लगटपणानं घराबाहेर डोकावलेलं गाव घरात नुसतं जग-यापाशी बसून घुग-या खात टाईमपास म्हणून गोष्टी चघळू लागलं. तीन दिवस सारखं पाणी चालूच असल्यामुळे रोजीरोटीचे व्यवहारही खोळंबले.
आकाशात ढगांची दाटी झालेली. पोट आटून आल्यावानी ढगातून पाणी बरसत होतं. अधूनमधून ढगांचा गडगडाट आणि सोबतीला विजेचा होणारा झगमगाट डोळे दिपवत घरातील लहान मोठयांना हादरवून सोडत होता.
कौलारूवरून खाली वळचणीत वाहत येणारं पाणी जराभर अंगणात खोळंबून पुढे सरकत होतं. अंगणात खोळंबलेल्या पाण्यावर पडणारे पाण्याचे थेंब अंगभर शहारून पाण्यात तरंग निर्माण करीत होते. थेंबांचा मनाला भुरळ घालणारा खेळ सारेच नवलाईने पाहत होते. लहानसहान पोरं मात्र कागदाची नाव करून खेळण्यात गुंगून जायचे. अंगणातील पाणी नाल्या भरू भरू वाहू लागलं.
दडदड पावसामुळे गल्लीबोळीतील रस्त्यात गिचडगाचड करून चीड आणणारा रेंदा पाण्यासोबत वाहून जात होता. पाण्यामुळे कोणीच चिटपाखरूही घराबाहेर न पडल्यामुळे ळे रस्ते कसे सुनसान पडल्यासारखे दिसत होते. अवचित एखादा पोट जास्तच आटून आल्यामुळे डोक्यावर पोत्याची घोंगसी घेऊन भर पावसात आडोसा साधून निसर्ग नियमाला वाट मोकळी करतानी दिसत, तर कोण्या एखाद्या देवडीत जगऱ्यापाशी बसून असलेलं नवथरांचं टोळकं मनात आलं की पाण्यात फिरून पाण्याची बातमी मोहल्ल्याभर पसरवत होतं.
पावसाचा मारा मुक्या मनानं सहन करणा-या नवथळ सुनवायरीसारख्या भिंतीही अंग चोरून एकाच जाग्यावर उभं राहून आपलं दुःख सोसत वळचणीशी बोलत जागीच उभ्या होत्या. झाडांच्या अंगाखांद्यावरून पाण्याचे थेंब निथळत होते. पक्षी घरट्यातच अंग चोरून बसले होते. गोठयातील गुरेढोरे खाली पाणी साचल्यामुळे अंग चोरून जागीच उभी होती. गोठयाच्या छतातून गळणारं पाणी त्यांच्या अंगावर शहारे उठवून खाली ठिबकत होतं. त्यांच्यासमोर टाकलेला कडबा कुटारही पावसानं
ओलं होत होतं. काही गोठयात मात्र जनावरं सुरक्षित होती. दिवस कलायला आल्यामुळे वातावरण अंधारल्यासारखं झालं होतं.
एकाएकी भडभड आवाज व्हायचा. त्या आवाजासरशी काळजात चर्र व्हायचं.
' कोणाची भित पडली माय वो.....' म्हणतच थंडीनं थाटलेली पिसाबुढी खाटल्यावरील अंथरुणात शरीराची थोडी चाळवाचाळव करून पुन्हा तशीच दडून राहिली. वळचणीखालून बाहेर येणा-या डोळयांनी एकदुसऱ्यांना पुसून अदमास घेतला. आतावरी जगऱ्यापाशी टाईमपास करीत बसलेलं टोळकं आवाजाच्या दिशेने पिसाबुढीच्या घराजवळ सरकलं होतं.
भिंत पडल्यामुळे उघडा पडलेला तिचा संसार दिसताच पुढं होत दार ठोठावून तिला जागवलं आणि तिची वाट न पाहताच आत शिरलं. पडल्या बाजूने आत घुसत दार उघडलं. चुलीवर मोडून पडलेल्या भिंतीच्या मातीत पडझड झालेल्या वस्तू उचलून तिच्या सपरीत आणून मांडू लागले. घडवंचीवरची वाकळी बोंदरं आणि आतून आणलेलं सामानासुमानाकडे पाहत पिसाबुढी पडलेल्या भिंतीसाठी हळहळली.
आतापर्यंत कोरडी ठण्ण असणारी तिची सपरी पोरांच्या पायानं गिपचिप झाली होती. तिची पडलेली भिंत पाहण्यासाठी आलेली आजुबाजूची मंडळी सपरीच्या धडीवर रेंद्यानं भरलेले खेटरं घासून कोरडी करत होती. पिसाबुढीचा अर्धा अर्धा झालेला जीव डोळयात प्राण आणून पावसाला शिव्याशाप देत होता.
दिवस कलायला आल्यामुळे वातावरण अंधारून आल्यासारखं झालं आणि काही वेळातच घरांची, झाडांची उंचीही अंधारात गुडूप झाली. तरीही पाण्याचा जोर कमी झालेला नव्हता. रात्रभर पाण्याची झडी चालूच होती. थेंबाच्या सुमधूर सांग्रसंगीतावर गाव पेंगू लागलं होतं.
चार दिवस एकसारखं बरसून न थकल्यामुळे झुल्पटंच पावसाचा डोळा उघडला. ती 30 जुलै 1991 ची अंगावर शहारे आणणारी सकाळ होती. अंगाला आढोखे पिळोखे देत गाव अंथरूणातून जागा होत होता. उजाडल्यावर प्रात:विधीसाठी नदीवर बसलेला कोणीतरी एकजण एकाएकी आलेली नदीची थोप पाहून ' पळा रे पळा ..पूर आला..., पळा रे पळा ., पूर आला... ' म्हणत जसा बसला होता तसाच उठून धोतर हाती घेऊन गावाकडे पळत सुटला. त्याच्या आवाजानं सावध झालेलं गाव रस्त्यावर येऊन बाहेर डोकावू लागलं.
चांदसात महादेव गुव्हाऱ्यांच्या खाटीखाली पाणी आलं तरी त्याला जाग नव्हती. कोणाचं तरी लक्ष गेलं आणि त्याला उठवून बाहेर घेऊन आलं. विमनस्कपणे तो मात्र आपल्या घरटयाकडे पाहत होता.
संथ वाहणाऱ्या बेलनदीचं पाणी अस्ताव्यस्तपणे मुसंडी मारून जागा मिळेल तिकडे पसरत चाललेलं पन गाव हबकलं. इकडे होळीच्या मैदानातील नाला तुडूंब भरल्यामुळे तिथल्या राहूटीतील हाती येईल ते आणि सहजी नेता त्या चिजा घेऊन घराबाहेर पडत होते.
पाण्यामुळं बेघर झालेले लोकं प्रायमरी शाळेच्या आवारात जमत होते. जो तो धावपळीत गुंतलेला. घाईगर्दीत लेकरं मायचे राहिले नाहीत अन बाप लेकरांचा उरला नाही. हातात येईल ते घेऊन माणूसकुणूस शाळेच्या दिशेने धावू लागला. पोरं सोरं कोंबडीच्या पिलागत मायमागं पळत सुटले.
गडीमाणसं डोईवरचं ओझं सांभाळून शाळेच्या आवाराकडे सरकू लागले. म्हातारे कोतारे, पांगळे दम टाकत धापू लागले. कोणाच्या डोक्यावर बाजा-खाटा, कोणाजवळ संदूक, पेटया, कोणासोबत कोंबडया, बकऱ्या तर कोणासंग ढोंर - वासरं, तर कुणासंग आणखीन काही काही. यात्रा उतरल्यावानी शाळेचा आवार गजबजून गेलेला.
ज्यांना पुराचा धोका होणार नव्हता अशी शाबूत राहिलेल्या घरादारातील मंडळीशी घरोब्याचे संबंध असलेले त्यांच्याकडे जाऊन राहिले. मात्र विशेष संबध नसलेले शाळेच्या आवारात जमू लागले होते. पिपे, गाडगे मडके, तेलाच्या आणि रॉकेलच्या डबक्या, गुंड लोखंडी पेटया, संदूक, डाळदाण्याच्या गाठोडया, सायकली, सुप, टोपले, घमेले कामाची औजारे, कपड्यांचे बोचके, टमरेटं, खेटरं अशा सा-या घरगुती सामानांचा ढीग पडलेला.
शेतक-यांनी औतखाटयाची भांडे, लोहारानं घण, ऐरण, छिन्न्या तर मांगानी बॅन्डबाजा आणला होता. नदीकाठच्या वस्तीतील मंडळीही आपल्या सामानासुमानासह आवारात थबकून राहिली होती.
दोन्ही गावातील धोक्याची ठिकाणं सोडून वस्ती हलली होती. पाण्याच्या जोरदार धडकांमुळे नदीकाठाची झाडं, मुळे खिळखिळी झाल्यामुळे मुळासकट उखडून पाण्याबरोबर वाहू लागली होती. नदीपात्रात लाटामागून लाटा त्यात गरगरणाऱ्या भोवऱ्यांचा झपाटा. जिकडे तिकडे गढूळ पाणी अन् पांढूरका फेस.., एव्हढूशी नदी पण आता नजरंत मावत नव्हती. पाण्याचा तर काही थांगच लागत नव्हता. कुठून कुठून जमा झालं होतं एवढं पाणी देवच जाणे...! पुराचं रोंघावणं., सपाटयात सापडेल ते ते घेऊन पुढं पळणं..!
फार्मसीच्या विठ्ठल मंदिराच्या मागून नेहमी खळाळून हसत वळण घेणारी बेलनदी अबोल झालेली. नदीतील कुमाजीबाच्या डोहातील पाणी क्षणभ-यातच फुगाटलं होतं. गावाभोवती पसरलेली नदी गर्भार बाईवानी दोन्ही कुसा भरत गेली होती. नदीकाठच्या गोदऱ्यातही पाणी चढून बसलेलं. नदीकाठवा पाय पुढं पुढं पसरवत गावाकडे सरकलेला. नदीला येऊन मिळणाऱ्या नाल्या ओघळांची रूंदावलेली तोडं मेलेल्या कुत्र्याच्या फुगीर मांडयावानी दिसत होते.
पाण्याचा अस्ताव्यस्त पसारा पसरवून बेलनदी आपल्याच तालात बेफाम वाहत होती. विठ्ठल मंदिरालगत असलेली फार्मसीच्या शाळेची इमारत पुरानं धुऊन नेली होती. विठ्ठलरखुमाईच्या मंदिराशिवाय तिथं शाळेचं टिपूसही उरलं नव्हतं. आजुबाजूची वस्तीही पाण्यानं धुऊन नेली होती. नदीनं नेहमीचं नागमोडी वळण टाळून चांदसच्या महादेवाच्या मंदिराजवळून सरळ धाटी फोडली होती. तिच्या उसळणाऱ्या बेफाम लाटांवर नजर ठह्यरत नव्हती. नदीपात्राच्या मध्यभागून लाटेवर लाट आरूढ होऊन ती पुढे वाहत होती.
धारेतला भोवरा पाणी गरगरा फिरवत स्वतःही फिरत होता. नदीकाठावरील मोठमोठी झाडंही पायाखालची जमीन सरकल्यामुळे कोसळून पाण्यात तरंगत होती. तर कधी पाण्याबरोबर आलेलं काडीकैचण, ओंडकाही मान दबल्यासारखा पाण्याबरोबर फिरत होता. नदीपात्रातील धारेचा जोर नदीकिना-याशी धडका मारीत होता. गावात घुसलेलं नदीचं पाणी पाहून ' असा पूर कई आपून अजून पाह्यला न्हई ' म्हणत जुनी जाणती मंडळी सांगत होती. दुरूनच नदीचा आकस्ताळेपणा पाहत
असलेलं गाव मनानं धास्तावलं होतं.
धारेनं आलेली झाडंझुडूपं पुलाजवळ अडकल्यामुळे पाणी गावाकडे सरकू लागलं होतं. मात्र पाण्याची धार पुलाला बगलेत घेऊन चांदसच्या वडाजवळून घुबडपेंडाच्याही पुढे सरळ निघाली होती. तिथं असणारी वडाच्या मायेची उब घेऊन असलेली नवी घरंदारं आणि वस्ती तिनं आपल्या कुशीत सामावून नेस्तनाबूत करून टाकलेली. नदीच्या काठावरील आता तो वाळलेला वड आपल्या कुशीतील त्या वस्तीकडे उदासपणे पाहत अजूनही उभाच दिसतो.
वाठोडयात होळीच्या मैदानातून जाणारा नाला पुढे नदीत उतरत होता. नदीचं पाणी तुंबल्यामुळे नालाही आपल्या काठावरील वस्तीला मागे हटवून वस्तीत सरकला होता. नदीकाठचा सारा परिसर पुराच्या पाण्यानं उध्वस्त झाला होता. अंगात हीव भरल्यासारखी झाडे उभी होती.
नदीवरील पूल पाण्यात बुडल्यामुळे दोन्ही गावाचे संबध तुटले होते. दोन्ही गावं उंचावरून एक-दुसऱ्यांकडे नुसती दुरून पुसनच पाहत होती. नजरेसमोर होत असलेली धुळधानी पाहत नुसतीच जाग्यावर उभी होती. सध्यातरी ती तेवढंच करू शकत होती.
नदीकाठची घरंदारं पडून झोपडया नदीच्या पात्रात तरंगत होत्या. पाण्याबरोबर वाहत आलेला घरादारांचा लाकूडफाटा धारेच्या बाजूनं कोंडून मागे पाण्याबरोबर गोल गोल फिरत काठाशी तरंगत होता. पुराच्या पाण्याबरोबर वाहत आलेल्या धान्यानं भरलेल्या दोन कणग्या पाण्यावर तरंगत येऊन वाठोडयात नदीच्या काठावर सापडली होती. पाण्यात भिजूनही त्यातील दाळदाणा जसाच्या तसाच होता. पाण्याबरोबर वाहत येणारा लाकूडफाटा, वाळलेली झाडंडझुडूपं अंगरठी हिम्मतबाज माणसं पाण्यात घुसून काठावर ओढत आणून जमा करण्यात गुंतली होती.
उजाडल्यानंतर नदीला पूर आल्यामुळे गाव सावध झालं होतं. त्यामुळे नदीनं पुराच्या पाण्यात काठावरील घरेदारे घेऊन नेली असली तरी जिवितहानी मात्र झालेली नव्हती. सर्व नदीच्या पात्राकडे आ वासून पाहत होते. या गोष्टीसाठी तरी तिचे उपकार मानत होते. भूतकाळातील पाण्यापावसाच्या, पुराच्या, नदीच्या गोष्टी चघळीत होते.
पावसाच्या जोरदार प्रकोपामुळे अस्ताव्यस्त व विस्थापित झालेल्या गावाच्या बातम्या टिव्हीवरून, रेडिओवरून ऐकू येत होत्या. नदीकाठावरील गावांना धोक्याचा इशारा वेळोवेळी मिळत होता. पाण्यात सापडलेल्यांना वाचवण्यासाठी चाललेल्या आटोकाट प्रयत्नाचं प्रक्षेपण टिव्हीवर दाखविलं जात होतं.
अचानक आलेल्या या मुसळधार पावसानं याच गावात नाही तर पुढे वर्धा नदीला मिळणा-या नदीकाठावरच्या प्रत्येक गावात हाहाःकार माजविला होता. गरज नसतानाही हटखोरावानी बरसलेल्या पावसाला शिव्याशाप देऊन सारे आपआपल्या पोटाची भूक भागविण्यात रमून गेले. पोटातील भूकेची जागा ब्रम्हानंदानंही फारवेळ भरून निघणार नव्हती.
ज्यांचं सर्व घरदारही वाहून गेलेलं ती विचारात बसून असली तरीही भूकेनं त्यांचीही पाठ सोडली नव्हती. पाठीला चिकटून असणारं पोट तसं होऊ देणार नव्हतं. ज्यांच्याजवळ दाळदाणा नव्हता त्यांना ग्रामपंचायतीनं कंट्रोलातून आणून वाटप केल्या जात होता.
दिवस कलला आणि शाळेच्या आवारातच तीन दगडाच्या चुली पेटू लागल्या. पाण्यानं ओलं झालेलं सरपण तग धरत नसूनसुध्दा बायाबापडया फू.....फू॒ करीत पेटवत होत्या. पेटून उठलेल्या चुलीत कुटूंबासाठी अन्न शिजू लागलं, लहानसहान पोरंसोरं जेवणासाठी चुलीजवळंच चिकटून बसलेली.
शाळेतल्या गर्दीकडं मुटूमुटू पाहणारी लेकरं मायच्या पोटाशी दडली. कोंबडयाच्या कू.......कू व बक-यांची म्यॅ.....म्यॅ गर्दीच्या गोंधळात गडप झाली होती. एकाचं बोलणं दुस-याला ऐकू जात नव्हतं. चिमटे घेऊन दुस-याशी बोलावं लागत होतं. एवढी गर्दीची आपआपसात बचबच सुरू होती.
आयाबायांनी पदराखालच्या लेकरांसाठी पान्हा सोडला.गावसरपंच येऊन चौकशी करून गेले. जेवणं खावणं झाल्यावर लेकरंबाळं पेंगुळले. दिवसभर कष्टणा-यांचेही डोळे मिटू लागलेले. इतक्यात विरोधी पार्टीचे लोक आले. शाळेच्या आवारात जमलेल्यांची काय हवं नकोची खबरबात घेऊ लागले. आम्ही दोन वर्षा अगोदरच नदीच्या कडानं वाढत चाललेल्या वस्तीचं पुनर्वसन करून नदीकाठ मोकळा करण्यात यावा अशी मागणी केल्याचं विरोधी गट ठणकावुन सांगत होता. पण त्यांचं म्हणणं ऐकून घेण्यात कोणालाही रस नव्हता आणि ऐकून घेण्याशिवाय आता कोणाजवळ पर्यायही नव्हता. जो-तो आपआपल्याच कुरघोडीत गुंतलेला.
ते गेल्यानंतर काही वेळानं गावातील नवथळांचं टोळकं आलं. ते जमावाला पुरानं फक्त आपल्याच गावात नाही तर वर्धेच्या काठावरच्या गावातही पाण्यानं कशी नासधूस केली, कसा हैदोस घातला ते सांगू लागले. जिवाचा कान करून ऐकणारे लोकं हळहळले. त्यांच्या काळजावर भीतीचा काटा सर्रकन् उठला. आपआपसात पुराबद्दल बोलत राहिले.
लोकांना गोष्टीत कामी लावून एखादं नवतरूणांचं टोळकं गर्दीतून चक्कर मारत फिरू लागलं. बाया माणसं एकाजागी जमलेली पाहून त्यांना मोठा हुरूप चढायचा. सर्वांची काळजी जशी त्यांनाच असल्यावानी ते त्यांच्यात फिरून विचारपूस करीत.
टोळकं ' का गा किसनाभो..., काय चाल्लं शामूमामा... पुरानं तं कहरच केला इचिभैन सुधाकाका.... असं त्यांच्याशी बोलत चालत इकडून तिकडे अन् तिकडून इकडे नुसतंच येरझारा मारत होतं. जीवभर सेवा करण्याची हीच योग्य वेळ समजून बायापोरीतून मुद्दाम फिरत होतं. एखादा नवथळ तरणाताठी तरूणी दिसली म्हणजे काही कारण नसतानाही बुढयाबाढयायशीनं अल्लम टल्लम बोलत राहून तिच्यावर नजर फिरवून घेत होतं. ते बिचारे मात्र दिवसभराच्या थकव्यामुळे गाढ झोपलेले.
त्यातील एखादा हाती असलेल्या बॅट्रीकचा उजेड दाटीवाटीनं अंग टाकलेल्या लेकीबाळीकडे मुद्दाम फिरवत. टोळकं झोपेच्या गडबडीत कोणाचं उघडं पडलेलं पोट हावरट नजरेनं न्याहाळीत होतं, तर कोणाच्या उघडया पडलेल्या पोट-या न्याहाळून ओठ दाताखाली चावून जिभेनं चाटत होते.
नवथळांच्या या हालचालीकडे काही बुजूर्ग मंडळी कौतुकानं पाहत होती, तर कुठं पाच दहा माणसं घोळका करून गोष्टी करीत बसलेले. कोणी दमेकरी घशात दाटलेला चिकट चिकट थुका जाग्यावरून उठून थुंकत होता.
एखाद्याच्या उशाशी बांधलेलं बकरं जागीच लेंडया टाकत होतं. हातपाय तन्नावून आळसावलेलं अंग मोकळं करत होतं. घोळका करून बसलेली मंडळी पुरात सापडलेल्या गावांचा ऐकलेला हालहवाला एकमेकांना देत होतं. पडवीत एकूण गोंधळच झालेला. त्यामुळे टोळक्याचं चांगलंच फावत होतं
पावलाच्या आवाजानं अलोकाबुढी जागी झाली. पोरं इकडे तिकडे फिरून पुन्हा तिथंच आली. तिला लगटून झोपलेल्या तिच्या नातीच्या भरदार उरोजाकडे डोळे रोखून पाहू लागली. पोराचं टोळकं दिसताच तिनं नातीच्या अंगावरची घसरलेली वाकळ चापूनचोपून पोरीला पांघरली.
अंथरूणावर उठून बसत आवाराकडे पाहत ' अजून झोपलास न्हई काय गा वामन... ' अशी हाळी दिली. ते त्याला ऐकूही गेलं नसेल पण ते टोळकं तिथून जाईपर्यंत ती अंथरूणावर तशीच बसून राहिली. या मोकाट पोरांची तिला भलतीच धास्ती वाटू लागली होती.
इकडे बाहेर आवारात आल्यावर टोळक्यातला एकजण आपल्या सहका-यालाच म्हणाला,
' म्हैत न्हई काय....तिच्या बापाचा हात घणावर बसला हाये म्हून '
' मले काय म्हैत होतं भोसडीचं..? '
' तुमी आन्ता इचिभैन लाता खाची...., तुमच्यासंग -हायनं न्हई पुरत '
' मंग जाणं तं...., आन् तुयतं चांगला घुरूघुरू पाह्ये रे भोसडीच्या '
' तसं न्हई म्हणत मी, पण... '
' काईच न्है व्हतं ना बे.. हिथं एकाचं खेटर एकाच्या पायात न्हे... वाह्यत्या गंगेत हात धुन घ्या लागत्ये बाकी काय...? ' आपल्याच सहकाऱ्याच्या अशा बोलण्यावर एकजण ओठावरून जीभ फिरवत बोलला.
' ह्या कोंटयात भितीच्या कडानं कस्तूऱ्याची चिकनी पोट्टी सट झोपली हाये स्साली '
' थे म्हंतं काय मुकी सगुना '
' मुकी झाली म्हून काय झालं., पाह्यला न्हे फटाका कसा सट हाये तं.., मोंढयाचा माल हाये माल...'
' मंग काय करतं होठ चाटल्यानं पोट थोडंच भराचं -हायलं..? '
' ज्यमंन तं अर्ध्याक राती यू....... गठली तं गठली '
' तुमीच घ्या रे बा टोले.., आन् खाजा लाता.., आपून न्है पडत तुमच्या भानगडीत.., चाल्लो रे बा आपून..' असं म्हणत त्यातीलच एकजण उदून चालू लागला. चालता चालताच बोलला.
' लेकयहो मांगलदिसा सुटले म्हून निभली तरी श्यायन्ये न्हह झाले काय बे ;
' थांब जराकस आमाबी येतो '
म्हणतच सारे त्याच्यासोबतच चालू लागले.
जेवणरात्र टळून पोरंबाळं पेंगुळले. सरपंच चार दोन कार्यकर्त्यासह आला आणि हवं नको विचारत चौकशी करून गेला. पुराच्या पाण्यानं मायेची उब देणारी घरंदारं बेवारशासारखी पाण्यात उभी होती. संसारात पाणी मुरलेले नदीकाठच्या रहिवाशांची घरंदारं नदीच्या पाण्यात वाहून गेली असली तरी पाऊस मात्र डोळयातच थबकून गेलेला.
वातावरणातला थंडावा शरीराला कापरे भरवत होता. बायाबापडया चमडीचोरांच्या भिरभिरणाऱ्या नजरांपासून आपला देह पांघरुणात दडवून पाठ टेकविण्यापुरत्या असलेल्या हातभर जाग्यात उकड्झोप घेत होत्या. चमडीचोरांच्या धाकानं काही मोजकी माणसं जग-यापाशी गोष्टी करत आपला वेळ धकवत होती.
रात्रभर तसा कोणाचाच डोळा लागला नाही. गाढ झोपलेला म्हातारा अंगात कापरं भरल्यासारखा ' गावात पाणी घुसलं तं मंग मी काय करू, मी न्है सोडत माह्यं घर... तुमी जा जाचं असंन तं.. ' म्हणत झोपेतून दचकून उठला. त्याच्या आवाजानं जागी झालेली मंडळी भेदरली होती. काळजावर कोरलेलं घरदार पुसलं नव्हतं. रात्र क्षणाक्षणानं पुढे सरकत होती.
सकाळी नदीचा ओसरलेला पूर पाहण्यासाठी जमलेली मंडळी आता आपल्या घरादाराच्या खाणाखुणा शोधू लागली होती. घरादाराचा साधा मागमूसही न गवसल्यामुळे मनातल्या मनात हळहळत होती. झुराला शिव्याशाप देत होती. चर्र झालेल्या काळजानं नुसतीच टिपं गाळीत होती. पुराचं पाणी तसं डोळयातच थबकून राहिलं होतं. घरादाराच्या.., सुखदुःखाच्या आठवणी काळजात खदखदून पापण्यातून बाहेर निथळत होत्या.
पूर ओसरल्यानंतर शासनानं दिलेल्या मदतीने पपया पाण्यानं विस्थापित झालेल्या जनसमुदायाचं, ग्रामपंचायतीने गावाबाहेर महादेव पिंडीच्या बाजूने उंचावर असलेल्या लाल देवाच्या टेकडीवरच्या मोकळया जागेत बस्तान मांडलं होतं.
सुबाभूळीच्या बल्ल्यांना खेटून बांबूच्या नव्या कोऱ्या चापा उभ्या राहिल्या. तर काही बल्ल्या पाठीवर टिनपन्न्याचा भार सोसत उभ्या बल्ल्यांचा आधार घेऊन घरटयात राहणा-याला मायेची सावली देऊ लागल्या. एकूण गावाबाहेर असणाऱ्या लालदेवाच्या टेकडमाथ्यावर आता गजबज गजबज ऐकू यायला लागली होती.
झाल्या गेल्या घटनांचा विसर पाडून सारेच आपल्या रोजीरोटीच्या चकात दळण दळू लागली. कामात गुंतलेल्या माणसांचं एक बरं होतं. कामात त्यांचं मन रमून तरी जात होतं.परंतू कडूलिंबाच्या झाडाखाली किंवा टिनपन्र्याच्या सावलीत बसलेली म्हातारी कोतारी घरादाराच्या आठवणीनं मनातल्या मनात तुटत राहायची.
बालपणापासून आयुष्य असं निकाली निघेपर्यंत सोबतीला असलेल्या घराच्या आठवणीनं आचकाय बुचकाय झालेलं मन आठवणीत नुसतंच गटांगळया खात राहायचं. कापरं भरलेल्या मनानं वावरणा-या माणसांच्या ओठातील शब्दच खंडलेले.
शहाण्या माणसांचं मोजकंच कामापुरतं बोलणंच तेवढं उरलेलं. पोरासोरांचा आवाज, त्यांचं खेळणं, कुदडणं आणि कधी रडणं तेवढंच फक्त कणा मोडून पडलेल्या त्या जिवांचं. त्या वस्तीचं चैतन्य होतं. बाकी सारे ढिम्म, शांतपणे एकाचजागी उभ्या असलेल्या झाडासारखे, तर काही दूरवर उदासपणे पाहत आपल्या गतआयुष्याचा हिशेब करून झाल्यावर आपल्याच राहूटीच्या कुडाशी टेकून आकाशातील चांदण्या मोजण्याचा निष्फळ प्रयत्न करीत राहायची.
सूज उतरलेली नदी आता आपल्याच तासात खळाळून वाहत होती. तिच्या पाण्याच्या खळखळाटात आपल्या गप्पांचा सूर मिसळून बायाबापडया धुणं धुवायच्या.
आपल्या रोजच्या दुखण्या-जगण्यातून फुर्सत काढून काही लोक पुराचा फटका बसलेली गाव नजरेखाली घालुन आली. कुशीत घेऊन मायेनं वाढविलेल्या लेकरांना आपल्या कराल दाढेत खेचण्याचं नदीनं दाखविलेलं कौर्य पाहून मनोमन चरफडल...
जीवनाची व जगण्याची अशी झालेली दुर्दशा पाहुन हळहळलं..., मोवाडसहीत गणेशपुर, खैरगाव, देवळी, थुगावदेव, मदना, आमनेर, जलालखेडा पोरगव्हाण, वडाळा, वंडली, थडीपवनी, खारगड, अंबाडा, वरूड, काटी, वाडेगाव, मोरचूंद, चिंचरगव्हाण, चांदस - वाठोडा, लोणी, इत्तमगाव अशा पंधरा वीस गावांना फटका बसलेला परंतु मोवाड तिच्या भक्ष्यस्थानी सापडलेलं. तिथं जिवितहानी खुप मोठया प्रमाणात नदीनं घडवून आणली होती.
एवढी जिवित व वित्तहानी करूनही काहीच न घडल्यासारखी वर्धा नदी आपल्याच तासात शांतपणे वाहत होती. पात्रात जिकडे जावं तिकडे प्रेतं, नदीकाठावर प्रेतांचे ढीग साचलेले, सुरक्षाकर्मी आपल्याच कामात गुंतलेली. प्रेतांच्या सुटलेल्या दुर्गधीचा भपकारा नाकातोंडात जात होता. तरी पाहणारा दोन क्षण पाहून हळहळत बाजूला व्हायचा.
गावातील घरं दारंही होत्याची नव्हती झालेली पुराच्या पाण्यात तग धरून असलेल्या घरांचं सुध्दा कंबरडं मोडून त्यानी राम म्हटलेला. लग्न होऊन पहिल्या आखाडीला आलेल्या माहेरवासीनी रात्री झोपल्या त्या उठल्याच नाही, तर कुठे गावाबाहेर गेलेली तर काही पुरात वाहत गेलेल्या माणसांसाठी शोक करत वेडी व्हायला आलेली.
काही जीव मुठीत धरून हाती येईल ते सोनं, नाणं खनवटीला घेऊन लेकराबांळासहीत पळत असतांना त्यांना अर्ध्यात गाठून, घास घेत रागानं तनूफन् करीत नदी समोर चाललेली. घरंदारं, मोठीमाणसंच काय तर लहानसहानं लेकरं बाळं, इतकंच नव्हे तर मुकी जनावरसुध्दा आपल्या पोटाशी घेऊन वर्धा नदी बेफामपणे वाहत होती. कुणाचंही ऐकून घेण्यास त्यावेळी ती तयार
नसावी असं जाणवत होतं.
वर्धानदीला बेफाम पकी असल्यामुळे तिला येऊन मिळणाऱ्यां लहानसहान नद्यांना तिनं जागीच थबकवल्यामुळं त्या नद्या आपला पसारा वाट मिळेल तिकडे पसरवत मागे मागे सरत चालल्या होत्या त्यामुळे इतर गावांनाही तडाखा बसल्याचं बोललं जात होतं
चार दिवस आलेल्या पावसानं नदीला पुर आला खरा परंतु आजपर्यंत आपल्याच कुशीत मायेनं वाढविलेल्या जगण्याचं... जीवनाचं असं इंधन करून होत्याचं नव्हतं केलेलं. नदीनं अर्ध्या गावातून फोडलेल्या धाटीमुळे जगण्याची आणि जीवनाची अशी फाटाफूट केलेली
नदीच्या पात्रात विसावलेलं मृत्युचं थेमान पाहून जो-तो हळहळत होता. तिथून पाहून आल्यावर चार माणसांना सांगत होता. ते ऐकून झाल्यावर आपलं दुःख त्यांच्यासमोर काहीच नसल्याचं त्यांना जाणवत होतं
पाहूणा म्हणून न आलेल्या पुरानं, असं तांडवनृत्य केल्यामुळे जीवन, प्राक्तनं आणि जगणं या गोष्टींचा अर्थ शोधत बसण्याचं काम जो तो नुस्तंच करू लागलेला. जगणं असं झवण्यास आणत असलं तरी जिवात जीव असेपर्यंत झुंज संपत नव्हती. जो तो जगण्याचा शर्यतीत मश्गूल झालेला.
पुरात वाहून गेलेल्या घरादारांचं गावाच्या बाहेर पुनर्वसन झालेलं. जो तो आपल्या नव्या जगण्याशी जुळवून घेऊ लागला होता. विस्कळीत झालेलं जनजीवन आता कुठं स्थिरावू लागलं होतं
आतापर्यंत एकमेकांच्या जगण्याशी एकसंध असलेलं गाव नवं जुनं असं पुरानं केलेलं. जीवनाचं हे असं वाटोळं होत असताना पुरानं दिलेल्या झटक्यानं आलेल्या मानसिक विकलांगतेमुळे, सांध्यातून निखळलेल्या पायाचं लोढणं घेऊन मार्ग चालणाऱ्या वाटसरूसारखं... पुराचा झटका बसलेली गावातील पिडीत लोकं जीवन व्यतित करू लागली होती.
जुन्या गावापासून वेगळं झालेल्या पुनर्वसनानं वस्तीपासून वस्ती आणि माणसापासून माणूस दूर नेला होता. मनानं पांगळी झञातैली माणसं पाहून जो तो मनातल्या मनात शहारत होता. चौफेर पसरलेल्या वादळात नुसता हवालदिल झाला होता. आपली लहानपणची सारे सवंगडी... सारे शेजारी पाजारी... सारी आपली घरं दारं सोडून नव्या वस्तीत गेल्यामुळे वस्तीला आलेला भकासपणा उघड्या डोळयाने पाहणा-या सा-यांना तो धक्का खूप मोठा वाटत होता
जो तो आपल्या बालपणीच्या आठवणी तास न् तास नुसताच आठवत राहायचा. जीवनाचं हे असं वाटोळं करूनही नदी खळखळ वाहत शांतपणे समोर सरकत होती.
- प्रमोद बाबुराव चोबीतकर
Bel river | Chandas Wathoda I Mahapoor | Pramod Chobitkar | Nadi |
Comments