नाट्यसंस्कृती, सांस्कृतिक कार्य आणि कला
- RGDian
- Jan 15, 2021
- 6 min read
Updated: Sep 7, 2021
मध्यप्रदेशात उगम पावून महाराष्ट्रात वर्धा नदीच्या कुशीत विसावनाऱ्या बेलनदीच्या काठी वसलेलं एक पुरातन असं खेडं आहे चांदस - वाठोडा नावाचं. पूर्वी मोर्शी तालुक्यात येणारं हे गाव आता वरूड तालुक्यातील एक नावारूपास आलेलं गाव आहे. बदलणाऱ्या काळासोबत गावही बदललेलं आहे काळही बदलला आहे. काळ बदलतो तशी काळाची मूल्येही बदलतात. काळाच्या ओघात मूल्ये आणि परिमाण बदलत असले तरी कधीकधी ती जुनी मूल्येही आपलीशी वाटू लागतात.

' इतिहास मत पुछो... ' असं म्हणतात, पण हा इतिहासच मानवी भूगोलाचं रक्षण करीत असतो. माणसाचं मन घडवत असतो. त्याला मानवीयतेच्या पातळीवर जिवंत ठेवण्याचं कामही करीत असतो. पर्यायाने मानवी जीवनाचं सामाजिक आणि सांस्कृतीक भरणपोषण हा इतिहासच करीत असतो.
माणूस हा सामाजिक प्राणी आहे. समाजाचा घटक आहे. जमावाने राहणेच तो जास्त पसंद करतो. त्यामुळे समाजाचा त्याच्यावर पगडा असतोच असतो. सामाजिक मान्यता असलेल्या गोष्टी त्याच्यावर नकळत बिंबवल्या जातात. ज्या समाजात तो राहतो, उठतो, बसतो त्यांचे रीतीरिवाज, रूढी, परंपरा तो सहजच आत्मसात करीत असतो. समाजमान्य चालीरीती, देवदेवता, धार्मिक रूढी, परंपरा, भ्रम, समजुती या बाबींकडे तो सहजीच आकृष्ठ होत असतो.
गाव कितीही लहान वा मोठा असो. गाव म्हटला की लोकं आलीत. लोकं म्हटली, की समाज आला आणि समाज म्हटला, की संस्कृती आलीच.
देवळात देवदर्शनाला लोकांचे येणे, धार्मिक उत्सवाचे आयोजन करणे. इ. कार्यकमात कलेसाठीच जीवन अर्पण करणारी काही माणसे करीत आणि लोककला जपत.
कथेकरी बुवा म्हणून ख्यात पावलेले कै. शंकरराव कान्होजी दवळेकर बुवा आपल्या कलेने डफ तर कधी डायका, तुणतुणे यांच्या मोहक व लयबध्द साथसंगतीने तास न् तास लोकांची करमणूक करीत असत. त्यांच्या कार्यकमांना तारखा लागत.
नाटयकलेखातर तर गावच्या जाणत्या मंडळींनी केलेले ' राजा हरिश्चंद्र ' हे पहिले नाटक कै. बळीरामजी देशमुख तात्याजींनी पाण्यासारखा पैसा ओतून वठवले. त्यांनी नाटकासाठी केलेले पडदे, कपडे पुढच्या लोकांना कित्येक वर्षे पुरलेत. ते नाटयकला आणि साहित्य वाढवा हणून नेहमी बजावत राही. त्यातूनच नच प्रेरणा घेऊन लोकांनी गिरणीवाला, सिंहाचा छावा, धर्मवीर संभाजी, उमाजी नाईक, जनता अशी प्रसिध्द नाटके प्रयोग करून गाजवलीत. त्यात कै. रामराव गणपतराव दाजी आणि कै. आनंदराव चोबीतकर यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनीच गावाच्या इतिहासात नाटयकलेचा पाया रोवला.
कै. रामराव दाजींची ' कलेचा पारखी ' म्हणून ख्याती होती. त्याकाळी त्यांनी मातुरकर शाहिरांचे राष्ट्रीय पोवाडे, प्रो. राममूर्तीचे शिष्य विश्वमूर्ती यांचे शक्तीचे प्रयोग, दलाल बुवांचे किर्तन, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची शिव व्याख्यानमाला, जयराम शिलेदारांची नाटक कंपनी गावात आणून प्रसिध्द नाटके या खेडेगावात लोकरंजनासाठी आयोजित करून ते प्रसिध्द कलावंताचे कार्यकम गावात घडवून आणीत.
लोकांची करमणूक करणे ही बाब निमित्तमात्र पण राष्ट्रीय जलसा, दंढारीव्दारे लोकांमध्ये राष्ट्रीय भावना निर्माण करण्यास प्रसंगाची निर्मिती करून नाटयीकरण करण्यात कै. लक्ष्मणराव धामंदे यांची जलसा कंपनी तरबेज होती. प्रेक्षकांना त्यांच्या कार्यकमाचे आकर्षण वाटे. जनसामान्यांच्या मनावर त्याचा पगडा कोरला जाई. गावातील बालगंधर्व म्हणून गणल्या गेलेले नाटयवेडे कै. जयश्रीराम देशमुख, संगीतप्रेमी के. पर्वतराव पवार, कै. भैय्याजी खाडे ही सारी सत्यशोधक समाजाच्या प्रचारकार्यातही सहभागी होते.
कै. रामराव दाजींचा आदर्श डोळयासमोर ठेवून अनुकरण करणारी गायक, वादक ही हुरहुन्नरी मंडळी पुढे आली. त्यांनी आपली ' कला नुसती पोट भरण्यासाठी जपली नाही तर हयातभर कलेची सेवा केली. या कलावंतात कै. आत्मारामजी दवंडे जे मुंबईहून मूर्तीकलेचे धडे घेऊन आले होते. ते गणपतीची आणि इतरही मूर्ती अगदी हुबेहूब बनवत. त्या मूर्तीकलेतूनच किलेतूनच राष्ट्रीय भावना जागवण्यात आणि वाढविण्यास त्यांचा हातखंडा होता. लोकांत देशभक्तीचे वारे वाहावेत म्हणून ते ' हिंदमातादेवी चरख्यावर सुत कातत आहे ' असे हुबेहूब प्रात्यक्षिक साकारून विविध यात्रेतून प्रर्शन करीत आणि लोकांत देशाभिमान जागवित. जेथे आहो तेथे राहूनच आपल्याला जे काही करता येईल ते त्यांनी केले. ते नामवंत मूर्तीकारांतही नाव राखून होते तरीही ते प्रसिध्दी पराड.मुख जीवन जगले. अशा नोंदी ' चांदस - वाठोडा : कांतीदर्शन ' या पुस्तिकेत सापडतात.
बाकी गावात असतात तसे याही गावात सण, उत्सव, देवदेवता, भ्रम, समजूती, श्रध्दा, परंपरा होत्याच. वेगवेगळया सणात वेगवेगळया देवतांचं पूजन केलं जायचं. जाग्रणादी कार्यकम व्हायचे. त्यानिमित्ताने आरत्या, खंजेरी भजनं, देवदेवतांची स्तुतीपर गाणी, डायका, मनोरंजनात्मक कार्यकम व्हायचे. त्याकाळी मनोरंजनाची पर्यायी साधने उपलब्ध नसल्याने करमणुकीसाठी त्यायोगे दंढार, लावणी, वग, तमाशा, गौळण, नकला, कलगीतुरा, कव्वाली, रामलीला, असे सामाजिक आणि पुराणादी लोककलात्मक कार्यकम व्हायचे. यात स्त्रीची भूमिका एखादा पुरूषच करायचा.
पुढे यातूनच नाटयकला विकसित झाली असावी आणि यातूनच मनोरंजनात्मक कालखंड विकसित झाला असे म्हणता येईल. संगीत नाटये ही बव्हंशी पुराणादी घटना प्रसंगावर आधारीत असायची. पुढे ती रूपांतरीत होता होता ती तत्कालीन समाजव्यवस्थेवर भाष्य करू लागली. तत्कालीन माणसांना त्यात आपल्या भावनांचं प्रतिबिंब दिसू लागलं. पुढे तीच नाटके आपल्या रोजच्या चालण्या बोलण्याच्या भाषेत उपलब्ध होऊ लागली. बदलत्या काळानुसार स्त्री पात्राची भूमिका स्त्रीच साकारू लागली आणि लोकांना त्यात गोडी वाटू लागली, रस वाटू लागला.
गावातील श्रीमंत मंडळी अशा कलाकार लोकांना प्रोत्साहन देवून आपल्या गावात आणीत होती. त्यांना आठ आठ दिवस ठेवत होती. गावकऱ्यांना त्यांचे कार्यकम अगदी फुकटात उपलब्ध करून देत होती. त्या काळात त्या सर्व कलाकार मंडळीच्या खाण्यापिण्याचा आणि जाताना मोबदला म्हणून दिल्या जाणा-या बिदागीचा भार स्वतःच सोसत होती.
कोणत्याही कलेला राजाश्रय प्राप्त झाल्याशिवाय ती बहरास येत नाही, हे खरेच आहे. गावातील श्रीमंत मंडळींनी नाटयात्मक लोककलेला प्रोत्साहन देवून, तिला आश्रय देवून पडत्या काळात तिचे जतन व संवर्धन केलेले आहे आणि होते, हे विसरून चालणार नाही.

पूर्वी गावात गणपतीजवळ, देवीजवळ नाटके व्हायची. ऑक्टोबरच्या कडाक्यात थंडीत दस-याच्या आधीच नाटक असायचं कधीकधी पुढे दिवाळीत लक्ष्मीजवळही असायचं, तेव्हा नाटकाची खास जाहिरात व्हायची. ' गुलाबी थंडीमध्ये, रंगीन लाईटामध्ये कमल मोगे यांचं (अमुक अमुक... तमुक तमुक...) तीन अंकी नाटक पाहण्यात विसरू नका... विसरू नका... विसरू नका... ' असं त्रिवार सांगितलं जायचं. मी लहानपणी ती नाटकेही पाहिली, पण कमल मोगे बाई होती, की माणूस... हे मला अजूनही समजलेलं नाही. बाई दिसली तरी मी तिला कमल मोगेच म्हणायचो आणि माणूस दिसला तरी... कारण मागच्यावर्षी नाटकाच्या गरजेनुसार असेलही कमल मोगे स्त्री पात्राच्या भूमिकेत दिसायची तर पुढल्याच वर्षी पुरूष पात्राच्या भूमिकेत... त्यामुळे माझा सावळा गोंधळ उडायचा. कदाचित तुम्ही हसालही, पण तो काळच तसा होता. लहानपणी पाहिलेल्या पिक्चरमधला हिरोला खलनायकाच्या चार पाच गुंड माणसांनी मार मार मारलं आणि त्यातच तो मरून गेला. पिक्चर संपल्यावर अंतःकरणानं मी दुःख बाहेर पडलो. तेव्हा मला तो हिरो मेला याचंच अतीव दुःख झालं होतं. कालांतराने पुढे आणखी पिक्चर पाहण्याचा योग आला, तेव्हा तोच हिरो पुन्हा दिसला. रडावं की हसावं माझं मलाच समजत नव्हतं. आजच्या पोराला यात काही वावगं वाटणार नाही कारण विकसित झालेल्या तंत्रज्ञानाची त्याला माहिती आहे. बदलत्या काळानुसार त्याची मूल्ये बदलतात हेच महत्त्वाचं.
असो... पुढे नाटयकलेचा विकास होत गेला. हे गाव तसं नाटयवेडं. नाटकाचं वेड तसं या गावाला काही नवीन नाहीच. एकांकिका, नाटक लिहिणारा लेखकही या मातीतच तयार होत होता. श्री. वा. शा. देशमुख गुरूजींनी ही मुहूर्तमिढ रोवली असावी असा कयास आहे. पुढे गावातील काही नाटयवेडयांनी नाटकात भूमिका करण्यासाठी तालीम सुरू केली. स्त्री पात्रासाठी गावातील किंवा ओळखीतील कोणी बाईमाणूस तत्कालीन परिस्थितीनुसार तयार व्हायची नाही म्हणून बाहेरच्या शहरातून स्त्री पात्र साकारणारी नटीच तेवढी आणायची आणि नाटक करायचं. यासाठी गावकऱ्यांनीही गावातील कलाकारांना प्रोत्साहन दिलं. जर कुठे चुकलं असेल तेही रोखठोक टीकासुध्दा केली. खरं म्हणजे त्यामुळेही आपल्या या गावची नाटयपरंपरा त्याकाळी आणखी बहरास आल्याची दिसते.
नाटकासाठी स्त्री पात्र साकारणारी नटी बाहेरच्या शहरातील ठरवल्या जायची आणि बाकी सारी पात्रे गावातील मंडळी साकारायची. यामुळे आपणही त्यांच्यासारखे अभिनय करू शकतो, हा त्यांचा आत्मविश्वास या बाबींनी आणखी दुणावत गेला. एखाद्या मुरब्बी कलाकाराच्या मार्गदर्शनात नाटकाच्या मुहूर्ताचा नारळ फोडायचे आणि तालीम सुरू व्हायची. अशी नाटकाची गावात परंपरा सुरू झाली. अशा बसवलेल्या नाटकांचे कार्यकम बाहेरगावीही होऊ लागले. जाण्यायेण्याचे भाडे व नटीची बिदागी आणि कार्यकमासाठी लागणाऱ्या व आवश्यक असणा-या साहित्याच्या जुळवाजुळवीसाठी लागणारा खर्च. एवढयाशा थोडक्या भांडवलावर नाटकमंडळी बाहेरगावीसुध्दा नाटकाचे कार्यकम देत होते. नाटकात काम केल्याबद्दल कलाकारांना एक छदामही मिळायचा नाही. आपल्या अभिनयानं आपण इतरांना रिझवतो हे त्या कलाकारांचं खरंखुरं मानधन होतं. त्यातच ते खूप समाधानी होती. जादा मिळकतीची त्यांना इच्छाच नव्हती. ' खरं म्हणजे कलेवर प्रेम करणारी ती मंडळी होती. ' असं जुनीजाणती माणसं म्हणायची. आजची पिढी ही कलेवर प्रेम करणारी नाहीच, असा याचा अर्थ नाहीच. प्रत्येकजणच प्रतिभावंत असतो. त्यांच्या अंगचे गुणही न्यारेच असतात.
प्रत्येकाची प्रतिभा ही वेगवेगळी असते. अंगच्या कलागुणांना जसजसा वाव भेटतो आणि संधी साधून प्रतिभा बाहेर डोकावू लागते तेव्हा माणसाची कलेतील आवड लक्षात यायला लागते. कलेची आवड आणि त्यात प्राविण्य असूनही भागत नाही. त्याला ब-याच बाबी कारणीभूत ठरू शकतात. प्रत्येकजणच आपआपल्या कुवतीनुसार व परिस्थितीनुसार कलेवर प्रेम करीत असतो. जुन्याजाणत्या मंडळीच्या कला प्रेमाचे किस्से आजही काही मंडळी सांगतात.
त्याकाळी वरूडमधील विजय टॉकीजच्या स्टेजवर साकार झालेलं ' उमाजी नाईक' हे नाटक तर मैलाचा दगड ठरावं. त्याला कारणही तसंच आहे. उमाजी आणि काळोजी हे सख्खे भाऊ... उमाजी हा गोर गरीब, दीन दलितांचा कैवारी तर काळोजी हा पाताळयंत्री. बरं या नाटकात या भूमिका साकारणारेही दोघे सख्खे बंधूच. त्यांच्यात नाटकाचा जुनून इतका सवार झाला की दोघेही एकमेकांच्या जिवावर उठले होते असं म्हणतात. त्यामुळे नाटक अर्घ्यात बंद करावं लागलं. याच नाटकात श्री. रं. वा. खाडे गुरूजींनी एका आग्लं अधिका-याची साकारलेली भूमिका आणि. श्री. वानखडे गुरूजींनी ' अश्रूंची झाली फुले ' या नाटकात विद्यानंदाची साकारलेली भूमिका गावकऱ्याच्या अजूनही आठवणीत आहे.
इतक्यावरच हे सत्र संपलं नाही. पुढे तयार होणाऱ्या तरूणांनी आपल्या वयस्क मंडळीकडून अभिनयाचे धडे घेतले. नाटकाचं वेड तर आधीच त्यांच्या रक्तात भिनलं होतं. पुढे गणपती, देवीतच काय तर एखाद्या मंदिराच्या जीर्णोध्दारासाठी उन्हाळयातही नाटके होऊ लागली होती. एकूणच काय तर तत्कालीन तरूण आपल्या अंगच्या गुणांना लोकांसमोर साकार करण्याची संधीच शोधत होते. यात गावातील आता वयस्क झालेली बुजूर्ग मंडळीसुध्दा आहे तद्वतच पौढ झालेली त्यावेळची
तरूणमंडळीही आहे. नाटकाची हीच परंपरा आता आतापर्यंत शाळेतील कार्यकमांच्या माध्यमातून आजही जिवंत आहे. वा. शा. गुरूजींचा नाटयलेखनाचा वारसा श्री. प्रफुल्ल भुजाडे या नव्या उमेदीच्या एकाकिंका आणि नाटयलेखकानं जपला आहे.
आजही शाळेच्या मातीत हे नाटकाचं वेड आहेच. त्यातीलच काही मंडळी ही पोटापाण्याच्या निमित्ताने गाव सोडून बाहेरगावी गेली असली तरी नाटकाचं इथलं वेड सोबतच घेऊन गेली आहे. त्या सर्वांची नावे घेणं शक्य होणार नाही. त्याचा प्रत्यय आपल्याला आजही यू टयूबसारख्या नवीन तांत्रिक माध्यमातून प्रत्ययास येईलच येईल.
आणखी एक महत्त्वाची भूमिका या मातीतल्या नाटकानं पार पाडली आहे. ती म्हणजे या नाटकाच्या वेडानं त्यातच तयार झालेल्या व घडत गेलेल्या तरूणांचा जाणवत असलेला लक्षणीय आत्मविश्वास ही एक जमेची बाजू आहे. तोच आज त्यांचा सच्चा साथी म्हणून त्यांच्या सोबत आहे.
' रडता रडता हसा लागते गंमत आहे
आयुष्य अशी गंमत करते गंमत आहे '
मला हे वाटलं आणि खरं सांगतो हेच खरं नाटक आहे. हेच आपण सगळेजण पार पाडत आहे. हीच गावच्या या मातीच्या मायेची ओल आजही आपल्या सर्वांनाच कुरवाळते आहे. हाच आपल्या रंगभूमीचा आशीर्वाद समजू...
नाटकाच्या साध्या गोष्टीही न संपणारं आठवणींचं संमेलनच होतं खरेतर...
- प्रमोद बाबुराव चोबीतकर
Natak | Culture | Art | RGD | Pramod Chobitkar
Commentaires