top of page

'चांदस - वाठोडा' नावाचं गाव

Updated: Sep 7, 2021



बेलनदीच्या तीरावर चांदस - वाठोडा नावाचं जोडगोळीसारखं वसलेलं हे खेडं आहे. एकाच मायची दोन जुळी लेकरं असावी तशी ही दोन्ही गावे नदीमायच्या कुशीत दडून बसली आहे. या गावासभोवतीच मुसळखेडा, दाभी, हनुमानपेठ त्यालाच उमनपेठ असेही म्हणतात. पूर्वी तेथे रहदारी आणि मानवी वस्ती होती. अनेकवर्षे त्याचे अवशेष तेथे पहायला मिळालेत. तिथे दिसून येणारी पांढरी माती तिथे पूर्वी मानवी वस्ती असल्याची आजही साक्ष देते. आज तिथे वस्ती नाही मात्र लगतच्या मुसळखेडा या गावात वस्ती आहे. हे गाव परमहंस यशवंत माउलीच्या पदस्पर्शाने पुनीत झालेलं गाव आहे. पूर्वी चांदस - वाठोडा हे गाव आणि आज नसलेली ही इतर गावेही मोर्शी तालुक्‍यात अंतर्भूत होते, जिल्हयातील तालुक्याची सरंचना बदलली तेव्हापासूनच चांदस - वाठोडा वरूड तालुक्यात समाविष्ट झालेलं आहे. तुझ्याशी जमेना आणि तुझ्यावाचून करमेना असे दोन्ही गावाचे एकमेकात हितसंबध गुंतलेले आहे. चांदसात तसेच वाठोडयातही विठ्ठलराव रामराव देशमुख अशा सारख्याच नावाच्या दोन श्रीमंत व्यक्‍ती दोन्ही गावात एकाच कालावधीत होऊन जाणे आणि दोहोंनीही वडिलांचा वारसा पुढे नेत सामाजिक कार्यास वाहून घेणे... हा दैवदुर्लभ योगच आहे.


प्रशासकीय कारणास्तव दोन्ही गावची ग्रामपंचायत वेगळी आणि स्वतंत्र आहे. तरीही दोन्ही गावातील मंडळी आजही एकमेकांशी गुण्यागोविंदाने नांदतात. हीच बेलनदीच्या पाण्यानं दोन्ही गावात पसरवलेली मायेची ओल आहे.


दोन्ही गावाच्या ऐन मथातून न बेलनदी वाहत समोर सरकते. बेलनदीनंच दोन्ही गावाची भौगोलिक विभागणी केली आहे, असंच म्हणा ना...! पण तिच्या ओल आजही माणसातलं माणूसपण टिकवून आहे... आणि हीच खरी तिची या दोन्ही गावांना पूर्वांपार वारशात मिळालेली देणगी आहे.


दक्षिणेकडे तोंड करून उभं राहिलं तर उत्तर - दक्षिण वाहणाऱ्या बेलनदीच्या उजव्या अंगाला चांदस तर डाव्या अंगाला वाठोडा बसलेलं आहे. उत्तरेकडून वाहत येताना तिच्या दोन्ही काठावरच्या उंच उंच दरड पाहिल्या की दऱ्या-खोऱ्यातून आणि पर्वतराजीतून वाहत येत ती गावात शिरते आहे असा भास होतो. चांदसच्या भागाकडून नदीच्या काठावर एकही झाड नाही मात्र वळण घेताना तिनं त्या काठावरील मोकळा परिसर आपल्या बाहूत घेतला आहे. त्या मोकळया परिसरात शिंदीचं एक उंच झाड होतं आणि महादेव पिंडीशी एकूलतं एक वडाचं झाडं होतं, पण दोन्ही आता कधीचेच पुरात वाहून गेलेत. वाठोडयाच्या अंगानं मात्र काठावर एक उंच चिंचेचं झाड, कुमाजीबावाच्या डोहाच्या काठानं अंजनवृक्ष, बाभळी आणि पाण्यात पाय टाकून बसलेला औदुंबर असल्यामुळे त्यांच्या सावल्यांनी नदीचं पाणी झाकोळलेलं राहायचं. गावाच्या अंगाकडून तिला येऊन मिळणा-या नाल्यात अडूळसा आणि चंद्रज्योतींची झुडूपं होती.


पाण्याजवळ जायचं झाल्यास काठावरून पाच सहा फुट खाली उतरावं लागायचं. डोहाच्या काठाशी पाण्यात असलेल्या खडकावर उतरून वाठोड्याच्या मायमाऊल्या धुणं धुवायच्या. धुणं नुसतं कपडयांचचं नव्हतं, तर सासू सुनांचं संसारातील सुख दु: खाचंही असायचं. तद्वतच एकमेकींशी झालेल्या भेटीनं आणि सुखं दुःखाच्या वाटणीनं लाभलेल्या विरंगुळयानं ते मनाचंही धुणंच होतं. काठावरून पाहिलं, की पाणी अथांग पसरलेलं... डोहात नुसतं ते थांबल्यासारखंच दिसतं. मात्र झऱ्यासारखं पुढे वाहत असलेलं ते पाणी पाहून नदी खरेच वाहते आहे... हे कळू लागते.


डोहाच्या काठाने उंच टेकडीची नैसर्गिक तटबंदी लाभली आहे. त्या टेकडीच्या पूर्व आणि दक्षिण बाजूने वाठोडा गावाचा विस्तार वाढला आहे.


पुढं फार्मसीला वळसा घालून गोठाणापासून ती मनातल्या मनात खळाळून हसत स्टॅन्डजवळून पुढे सरकते. वाहतुकीच्या सोयीसाठी तिच्यावर तिथे सेतू बांधला होता. त्याची उंची कमी असल्याने पुराच्या पाण्यानं वाहतूक खंडीत व्हायची. तो धोका टाळण्यासाठी आणि चांदसच्या माथ्याची चढण कमी करण्याच्या उद्देशाने अलीकडे मोठा आणि उंच सेतू बांधलेला आहे. या सेतून दोन्ही गावाचेच नाही, तर तिथं राहणाऱ्या माणसांची मनेही जोडली आहे.


विठ्ठल मंदिराला लागूनच शाळा होती. फार्मसीची शाळा म्हणूनच ती ख्यात होती. पूर्वी तिथं फार्मसी असावी. कालांतरानं तिचंच शाळेत रूपांतर झालं असावं. दोन्ही गावातीलच काय तर पंचकोशीतील सारे विद्यार्थी विद्यार्जनासाठी तिथे यायचे. 30 जुलै 1991 च्या पुरात शाळा पार वाहून गेली मात्र विठ्ठल मंदिर तेवढंच राहिलं होतं. आता त्या मंदिरालगतच कार्यकमासाठी बांधलेल्या इमारतीशिवाय काही नाही.


नदीपल्याड काठ सोडून जरा अंतर राखून महादेवाचं पुरातन देवालय आहे. देवळामागेच जिल्हा परिषदेची मराठी प्राथमिक शाळा आहे. शाळेमागेच वस्ती आणि काही झोपडया होत्या. मंदिरासमोर मोठं वडाचं झाड होतं. मागच्या पुरातच ते वाहून गेलंय.


देवळाजवळच हनुमान आखाडा आहे. दोन्ही गावातील तरूण शरीर संवर्धनासाठी तिथं येतात. पूर्वी देवळापुढे शनिवारी सायंकाळी आठवडी बाजार भरायचा. मध्यंतरी तो पूर्णतः बंद पडलेला होता. आता मात्र तो पुन्हा पूर्वीप्रमाणेच भरू लागलेला आहे.


त्याच नदीकाठाने पुढे होत आलेले देशमुख मंडळींचे चौसोपी वाडे होते. आता पूर्वीसारखेच वाडे राहिले नाही, मात्र वाडयाच्या पुढे दगडांनी बांधलेले उंच चौरस धक्के त्याची साक्ष देत आजही उभे आहेत. गावातील जुने रस्ते दगडी फरसबंदीचेच.


चांदसच्या नदीकाठानं थोडं की गेलं, की जरा उंच माथ्यावर मातामायचं लहानसं मंदिर आहे. त्यालाच लागून चोबीतकर मंडळींची घरे आहेत. थोडं पुढे गेलं, की वडाचं झाड आहे. त्याच बाजुने नदीकाठ सोडून गावच्या माथ्याला लगटून वाढत गेलेली गोरगरीबांची वस्ती आहे. त्यांच्यामागे गाव पसरला आहे. डांबरी रस्ता ओलांडला, की नदीकाठी तेथे वटवृक्ष होता. त्या वडाच्या बाजुने झोपडीवजा घरांची वस्ती वाढली होती. मात्र 91 च्या पुरानं ती पूर्णतः खरडून नेली. तिच्या खाणाखुणाही आज तिथे शिल्लक राहिल्या नाहीत. त्या जागेवर आता बाभळीचं रान फोफावलेलं दिसते आहे. ज्या वटवृक्षाच्या आस-याने वस्ती वाढली होती. तो वड बिचारा ती वस्ती वाहून गेली तेव्हापासून तिचा शोक करीत डोळयात प्राण आणून शेवटच्या श्वासापर्यंत तिच्याकडेच पाहत उभा होता. आज त्याच्या अस्थिपंजर देहाचे अवशेषच तिथे दिसून येतात.


राजकारणात चांदसच्या देशमुख मंडळींचा बोलबाला अधिक होता. 1937 च्या प्रांतिक स्वायतत्तेनुसार जिल्हा कौन्सिलचे सदस्य म्हणून चांदस येथील रामराव तुकारामजी देशमुख उर्फ बापूसाहेब निवडून आले. त्यांच्याच कारकिर्दीत चांदस वाठोडा येथे मराठी माध्यमिक शाळा सुरू झाली. नवीन खोल्यांचे बांधकाम करून शाळेची सुधारणा केली. लागोपाठ दोन सत्र त्यांना कारकीर्द मिळाल्याने शाळेची उत्तरोत्तर प्रगती झाली. त्यांच्या या कामी कै. रामराव गणपतराव देशमुख उर्फ दाजी, कै. बळीराम भगवंतराव देशमुख उर्फ तात्याजी आणि कै. आनंदरावजी चोबीतकर यांचा मोलाचा वाटा आहे. याच शाळेत पुढे इंग्रजी वर्ग सुरु झाले. कालांतराने जिल्हा कौन्सिल रद्द करण्यात येऊन त्याजागी जनपद सभा आली. त्या जनपद सभेचे के. विठ्ठलराव रामराव देशमुख चांदस सरकार नियुक्‍त सदस्य म्हणून जाहीर झाले. बापाचा पिढीजात वारसा घेऊन ते पहिले जनपद सदस्य झाले. त्यांचेसोबतच के. दौलतराव ठाकरे आणि कै. डॉ. बाबुराव पाटील हेही जनपद सदस्य होते.


श्री. विठ्ठलराव रामराव देशमुख, चांदस यांच्या कामाचा झपाटा दांडगा होता. त्यांनी त्यांचे कारकिर्दीत शाळेची उत्तरोत्तर प्रगती केली. बेसिक एज्युकेशन अंतर्गत बुनियादी माध्यमिक शाळा... असे नाव देऊन शाळेचा दर्जा सुधारला. सूत कताई हॉल, शेती कामास बैलाचा गोठा, बैलजोडी, चरखे, टकळया, हातमाग सारे उपलब्ध होते. तसेच हनुमानपेठ जवळील गावरान विद्यर्थ्यांना शेतीज्ञान व्हावे म्हणून या शाळेला दिल्या गेले होते. कृषी विद्यापीठ मागणीच्या आंदोलनात मरण पावलेल्या विद्यार्थ्याच्या पालकास शाळेकडून काढून ते मालकीने दिले गेले. असा इतिहास आहे.


डांबरी सडकेच्या दक्षिणेस चांदसमध्ये ग्रामसेवक क्वॉर्टर, ग्रामपंचायत कार्यालय, सेवा सहकारी संस्थेचे कार्यालय, गोडाऊन आणि अमरावती डिस्ट्रीक्ट को ऑपरेटिव्ह बॅक शाखा, गुरांचा दवाखाना, वीज संकलन उपकेंद्र अशा उमारती आहे.


श्री. भाष्करराव उर्फ आप्पासाहेब देशमुख लागोपाठ दोनदा संचालक म्हणून निवडून आले. त्यांनी तत्कालीन सहकारमंत्री यशवंतराव मोहिते यांचे हस्ते उद्घाटन घेऊन गोडाऊनची वस्तू लोकार्पित केली. को ऑपरेटिव्ह बँक शाखा श्री. जनार्दन भांजीभाऊ चोबीतकर यांचे प्रयत्नाने उभी झालेली आहे. गावाच्या वैभवात भर घालून नवनव्या वास्तू उभ्या करून त्यांनी गावाला क्रणी करून ठेवलं आहे. अशा नोंदी ' चांदस - वाठोडा : क्रांतीदर्शन ' या नोंदपुस्तिकेत सापडतात.


चांदस भोवती भराटीचं बन, नागफणीची बेटं, ओघळ आणि उत्तरेकडे नदीकाठाने कडयासारखे उंचवटे. दोन्ही गावात खेटूनच वस्ती, तीही मोजकीच. वाठोडयात दोन हनुमान मंदिरे तर रोगराईपासून गावच्या पाठराखणीसाठी मातामाय व मरीमायची मंदिरे. तीच आपले रोगराईपासून संरक्षण करते अशी भाबडया समजूती लोकांच्या मनात ठाण मांडून बसलेल्या होत्या.


पूर्वेकडून आमनेर, ढगा, एकदरा, आमपेंड दक्षिणेकडून घोराड, उत्तरेकडून सावंगी असे वाठोडयाला बोरंग रस्ते... तर चांदसला पश्चिमेकडून वरूड, राजूरा, शेकापूर रस्ता. दक्षिणेस उदापूर, उत्तरेस सावंगी, पुसला, दाभी, शेंदूरजनाघाट, धनोडी हे रस्ते. पण हे सारे रस्ते अडचणीचे आणि आडवळणाचेच होते, पण तरीही तेच गावच्या पाचवीला पुजले होते. वाठोडयाच्या पूर्वेस ' मुंज्यानाला ' या भागात झाडी शिंदबन तर चांदसच्या पश्‍चिमेस वरूड, राजूरा रस्त्यावरही झाडी शिंदबनच. या दोन्ही भागात वाट अडवणुकीचे, वाटमारीचे प्रकार होत होते.


दोन्ही गावे मिळून एकत्रितपणे चांदसला मुलांना शिकण्यासाठी 1890 चे सुमारास गावठी शाळा काढली. त्याचे वर्ग चांदसच्याच मातामायच्या उत्तरेस नदीकाठी भरत आणि विद्यार्थीसंख्याही तशी जेमतेमच असायची. तिथेच बाजूला कै. बळीरामजी देशमुखांचा घोडयाच्या पागेसारखा उंटाचा गोठा होता. त्यांना उंट, घोडे, रोही, हरणे, सांबर, वाघ पाळण्याचा विलक्षण शौक होता. त्यांच्या देखभालीसाठीची ते विशेष काळजी घेत व तशी त्यांनी व्यवस्थाही निर्माण केली होती.


त्याच सुमारास आलेल्या पुरात उंटाचा गोठा वाहून गेला. पुढे हनुमानाचे मंदिरापासून उत्तरेकडे नव्या गावठाणासाठी जागा मिळाली. अधिकारपात्र लोकांनी तिथे आपापल्या सोयीनुसार जागा ताब्यात घेऊन गोठे व इतर बांधकामही केले. शिवमंदिराची वास्तू, शाळेसाठी आवश्यक तितकी जागा सोडून गावच्या बाजारासाठी, व्यायाम मंदिरासाठी जागा राखून ठेवली आणि मातामाय मंदिरापासून हनुमान मंदिराच्या सीमेपर्यंत नदीच्या पश्‍चिम काठाने वस्तीस पुराचा धोका पोहचू नये म्हणून दुहेरी धक्का बांधून घेतले ज्यायोगे गाव व हनुमान मंदिर यांना संरक्षण मिळावे. उत्तरेस मातंग व इतर दलितांनी वस्ती केली.


नव्या गावठाण जागेत शिवमंदिर स्थापनेसाठी चांदसच्या देशमुखांनी कंबर कसली. कामाची दिशा ठरवून बांधकाम साहित्य जुळवले. पाथरवट आणि गवंडयाच्या हातून दगड तासून योग्य आकाराचे चीरे बसवून घेतले तद्वतच कल्पकतेने मोठया दगडात रेखीव मूर्त्या कोरून घेतल्या. यासाठी मूर्तीकाराला घाम आणि रक्‍त गाळून मूर्त्या तयार कराव्या लागल्या आहेत. याकामी गावातील कलाकार मंडळींचेही योगदान मोलाचे ठरले. सर्वांच्या श्रमातून शिवमंदिर उभे झाले.


मंदिराच्या व्यवस्थापनासाठी के. बळीराम देशमुख उर्फ तात्याजींनी काही एकर जमीन दान केली. देवळात दिवेलागणीचेवेळी रोज सायंकाळी सनई चौघडा वाजावा म्हणून मातंग लोकांनाही उपजिविकेसाठी जमिनी दान दिल्यात. आजही मातंग समाजाचे वारसदार परंपरागत शेतीचे मालक झालेत. कित्येक काळापर्यंत ही प्रथा नेमाने चालू होती. पण अलीकडे देवळात सनई चौघडा वाजणे बंद पडले आहे, ही वस्तुस्थिती आहे.


पुढे हेच शिव मंदिर ' अस्पृश्यांना देवळे खुली करावी ' या आंदोलनामुळे 1947 साली के. प्रयागराव देशमुख यांनी ट्रस्टी नेमून कै. विठ्ठलराव गणपतराव देशमुख या धडपडया व्यक्‍तीच्या सूचनेने लोकार्पण केले. त्या ट्रस्टीचे सचिव कै. विठ्ठलराव गणपतराव देशमुख हे झाले आणि त्यांनी 26.10.1947 रोजी शुभमुहूर्त साधून हठयोगी आचार्य भन्साळी या गांधीवादी तपस्वीच्या हस्ते यथोचित सोहळ्यात हरिजनांसाठी खुले केले गेले.


लोकांना जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी वरूड, एकदरा येथे चिखल तुडवित जावे लागे. तरीही पुरेशा वस्तूही त्यांना मिळत नसत. अन्नधान्याअभावी लोकांना ढेप, मोह, बरबटा खाऊन गुजराण करावी लागे. त्यांची ती दशा संपविण्याच्या उद्देशाने व जीवनावश्यक वस्तू मिळाव्यात म्हणून गावात कंट्रोलचे दुकान उघडले. तद्वतच कै. विठ्ठलराव गणपतराव देशमुख, के. एम. टी. देशमुख आणि कै. एन. डी. देशमुख यांनी अथक परिश्रम करून सेवा सहकारी सोसायटी निर्माण केली. आजही ही संस्था र. नं. 1117 अन्वये कार्यरत आहे.


तसेच यापी यापूर्वी वरूड हेच गावचे पोष्ट होते. आमनेरपर्यंत या भागात पोष्ट ऑफीस नव्हते. या भागात ब्रँच पोष्ट ऑफीस उघडण्याच्या पाहणी करण्यास आलेले तत्कालीन ओहरसियर असलेले के. बंड यांची भेट के. एन. डी. देशमुख यांच्याशी झाली. ते दोघेही जुने वर्गमित्र होते. त्यामुळे के. एन. डी. देशमुख ब्रँच पोष्ट ऑफीस चांदस - वाठोडयातच व्हावे यासाठी प्रयत्नरत राहिले. त्यांच्या प्रयत्नांना फळ आले आणि गावात ब्रॅच पोष्ट ऑफीस आले. पहिले ब्रॅच पोष्टमास्तर म्हणून कै. कृष्णराव

सितारामजी कावडकर यांची नियुक्ती झाली.


"सुदृढ शरीरात सुदृढ मन" या उक्तीप्रमाणे दोन्ही गावातील तरूणांसाठी कै. आनंदराव चोबीतकर यांनी

शिवमंदिराचेच बाजूला आखाडयाची कल्पना पुढे आणली त्यासाठी के. बळीराम तात्याजींनी जागा दिली आणि दाभीच्या जंगलातून लाकूडफाटा आणून आखाडयाच्या नावावर बलभीम व्यायाम मंदिराची उभारणी के. आनंदराव चोबीतकर यांनी केली. यासाठी अनेक तरूण झटू लागले. या वास्तूची स्थापना वरूडचे स्वामी शिवानंद यांचे हस्ते झाली. तेथे लेझीम, लाठीकाठी, मल्लखांब, कुस्ती आदी व्यायामप्रकार होत असत. कुस्त्यांच्या स्पर्धा होत त्यात अनेक पहेलवान भाग घेत. दोनही गावातील अनेक कुस्तीगीर आपले नाव राखून त्यात चमकलेही. त्यात महादेवराव चोबीतकर, पर्वतराव कनाठे, शामराव निंभोरकर, महादेवराव बोंबले, पर्वतराव दवळेकर हे मल्ल म्हणून नावारूपास आले. आज ही सारी मंडळी काळाच्या पडद्याआड झाली आहे.


गणेशोत्सवात झुल्यावरची कामे, गांधी जयंतीला प्रभातफेरी, ग्रामसफाई हे उपकम कै. आनंदरावजी चोबीतकर 10 ते 14 वर्षांच्या लहान मुलांकडून दरवर्षी नेमाने करून घेत. त्यामुळेच गावाचे नाव तालुक्‍यात अग्रकमावर होते. त्यांच्याच प्रयत्नाने प्राथमिक शाळेचे मिडलस्कूलमध्ये रुपांतर झाले. यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.


कालांतराने कै. विनायकराव उर्फ तात्यासाहेब देशमुख यांनी कै. श्री. विठ्ठलराव शामरावजी देशमुख हे चांदसचे सरपंच असताना सरकारी निधी मिळवून जुन्या आखाडयाचे रूपांतर आज तिथे आहे त्या नवीन व्यायाम शाळेच्या वास्तूत केले. असा उल्लेखही * चांदस - वाठोडा : कांतीदर्शन ' मध्ये सापडतो.


कै. श्री. विठ्ठलराव शामरावजी देशमुख हे तरुण मंडळीत * आण्याजी ' नावानेच जास्त परिचित होते. ते अनेक व्यायाम प्रकार तिथे जातीने हजर राहून आम्हा तरूणांना शिकवायचे. त्यांच्याबद्दल तरूणांत अतीव आदर होता. योगाचे तसेच शारिरीक कसरतीचे कार्यकम ते अनेक शाळातून सादर करीत. पंचकोशीत त्यांना प्रोफेसर देशमुख म्हणूनच ओळखल्या जायचे. पूर्वी दोन्ही गावातील तरुण मंडळी बलोपासनेसाठी नित्यनेमाने तिथे जात होती पण आताशा तरूणाई मोबाईल आणि बैठया खेळाच्या मागे लागल्यामुळे व्यायाम शाळेच्या वैभवात खंड पडल्याचे दिसून येते. तरीही काही मंडळी व्यायाम शाळेची आजही आब राखून आहेत.


चांदसला नवीन गावठाणाचे जागी सोयीप्रमाणे कमाकमाने शिक्षणाच्या सोयींचा विस्तार केला. तिथे आजूबाजूच्या खेडयापाडयातून आडवळणीचे रस्ते पुडवित गाऱ्यातून फसणीतून रस्ता पार करून जीवनाला नवा आकार, नवे वळण देण्यासाठी शिक्षणासाठी मुले येत. पण तेव्हा शिक्षणाचा तेवढा प्रचार, प्रसार झालेला नव्हता.


श्री. शिवाजी शिक्षण संस्था स्थापन करून त्यायोगे शिक्षणाची गंगोत्री जनसामान्यांपर्यंत वाहती ठेवणारा आधुनिक भगीरथ कर्मवीर डॉ. भाऊसाहेब उपाख्य पंजाबराव देशमुख यांनी श्री. शिवाजी शिक्षण संस्थेची वरूडला शाळा स्थापन केली. त्यावेळी के. रामराव गणपतराव दाजींनी शिक्षण प्रेमापायी भरपूर देणगी दिली. त्याचा वाचनाचा व्यासंग दांडगा होता. त्यातूनच गावात श्रीराम वाचनालय निर्माण झाले. तेथील साधा कागदही वाण दुकानाचा सामान बांधणारा नव्हता तर वंशावळी बोलकी करणारा कालकुप्पीचा शिलालेखच होता.


त्यांचेसन 1902 मध्ये नारो बावाजी महाधट यांचे अध्यक्षतेखाली के. गणपतराव देशमुख व टेंभूरखेडयाचे के. गिरीधरराव देशमुख यांनी वाठोडा येथे या सत्यशोधक समाजाच्या कामाचा प्रचार व प्रसार चालविला होता.


या चळवळीव्दारे लोकांत चैतन्य खेळवल्या जाई आणि त्याच चळवळीवद्दारे ब्राम्हणेत्तर पक्षाची मुहूर्तमेढ रोवल्या गेली. यासाठी खुद्द कै. रामराव दाजींनी पुढाकार घेऊन त्यांचे चिरंजीव नुमाजी उर्फ बाबासाहेब, व्यावहारिक नाव विठ्ठलराव यांचा मौंज संस्कार वेदोक्त रीतीने पार पाडून सत्यशोधक विचार आचरणात आणला, आणि ' बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले ' ही उक्ती प्रमाण ठरवली.


कर्मवीर डॉ. भाऊसाहेब उपाख्य पंजाबराव देशमुख, कै. भाऊसाहेब हिरे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगेबाबा अशा थोर विभूतींची व ज्ञानवंतांची पायधूळ या वाडयात जतन झालेली आहे. त्यातूनच ज्ञान लालसेची गावाची तसेच त्यांचीही स्वप्ने रंगू लागली.


कै. रामराव गणपतराव देशमुख उर्फ दाजी हे धोरणी, हुशार आणि काळाची पावले ओळखून पुढचा विचार करणारे ते द्रष्टे ज्ञानवंत होते. आगामी काळात * पट्टेबिल ' येणार त्याआधी त्यांनी पट्टेबिलात आपली जमीन जाऊ नये म्हणून सावधानता राखून मर्यादेबाहेरील जमीन आपल्या मनाप्रमाणे वाटप करून समाजकार्य साधले. त्यात त्यांनी श्रीराम लिटरली इन्डस्ट्रियल अँन्ड अँग्रीकल्वर सोसायटी ' स्थापन करुन त्या संस्थेसाठी काही जमीन, काही जमीन श्री. दुर्गादेवी संस्थानसाठी, तर काही श्रीराम मंदिर संस्थानसाठी पध्दतशीरपणे विभागून मार्ग सोपा केला.


त्याच अनुषंगाने नुतन श्रीराम बाल विद्या मंदिर 5 ते 8 ची आणि नुतन श्रीराम बाल विद्या मंदिर 1 ते 4 ची कल्पना उदयास आली. पुढे या शाळेचा उद्घाटन सोहळा तत्कालीन खासदार श्रीमान पंढरीनाथ पाटील, चिखली, बुलढाणा यांचे शुभ हस्ते पार पडला आणि शाळेचे संस्थापक व अध्यक्ष कै. रामराव गणपतराव देशमुख उर्फ दाजी बनले. शाळेचा संसार वाठोडयात नदीकाठी असलेल्या श्री विठ्ठल मंदिराचे आवारात सुरू झाला.


'बुनियादी माध्यमिक शाळा चांदस - वाठोडा ' या चांदसच्या इमारतीत वर्ग । ते 8 शिकवल्या जात होते. आता नव्या वाठोडा येथे चालू झालेल्या वर्ग 5 ते 8 आणि वर्ग 1 ते 4 पर्यंतचे शिक्षण चालू झाले. वर्ग 5 ते 8 चे मुख्याध्यापक टेंभूरखेडा येथील डॉ. रामकृष्ण खुशालराव देशमुख, तर वर्ग 1 ते 4 चे मुख्याध्यापक वाठोडा येथील कै. शेषराव मालोजी साबळे हे होते. त्यांनी ' बुनियादी माध्यमिक शाळा चांदस - वाठोडा ' येथील राजीनामा दिलेला होता.


1956 मध्ये 9 वा वर्ग सुरू करण्यात आला आणि मुख्याध्यापक म्हणून नागपूर येथील श्री. विठ्ठलराव मोतीरामजी कहाळकर यांनी धुरा सांभाळली ती 198 म्हणजे सेवेतून निवृत्त होईपर्यंत...


कै. रामगराव गणपतराव दाजींनी 1960 मध्ये आपली कर्मभूमी सोडली. त्यांचेनंतर त्यांचे सुपुत्र श्री. विठ्ठलराव रामरावजी देशमुख यांनी अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. कै. रामराव दाजींच्या मृत्यूपरांत शाळेचे नव्याने नामकरण करण्याचे ठरले आणि ज्यांनी हा ज्ञानदानाचा यज्ञ चेतवला होता त्यांची स्मृती आजन्म जतन करण्याच्या महान उद्देशाने ' आर. जी. देशमुख कृषि विद्य लय, वर्ग 6 ते 8 तसेच वर्ग 1 ते 4 चेसुध्दा नामकरण त्यांचेच नावावर ' आर. जी. देशमुख बुनियादी बाल विद्या मंदिर... असे

करण्यात आले. असा दाखला ' चांदस - वाठोडा : कांतीदर्शन ' यात सापडतो.


कै. श्री. विठ्ठलराव रामरावजी देशमुख यांचे मृत्यूपरांत अध्यक्षपदाची धुरा त्यांचे सुपुत्र श्री. अनिलकुमार विठ्ठलराव देशमुख यांनी सांभाळली आहे. शाळा दाजीच्या शिरपेचातील मानाचा तुरा आहे.


नदीच्या डाव्या अंगाला फार्मसीची जुनी शाळा, नंतर देशमुखाचं घरं, वडाजवळ बुरड समाजाची वस्ती, त्याला लागूनच कलाल मंडळींची घरे, पुढे गेल्यावर नदीकाठी गोवारी समाजाची घरे, 1991 च्या पुरात वाहून गेल्यामुळे आता ती वस्ती ओस पडलेली आहे. नदीजवळ शेवटी स्टॅन्डलगत कलालाचं हॉटेल होतं. गावातही कुठे कुठे रस्ते दगडी फरसबंदीचेच. दोन्ही गावं तशी आत पसरलेले मात्र वाठोडा लांबीरुंदीनं थोडं ऐसपैस आहे. वाठोडयात पाटलांच्या गढीला लागूनच उंचावर शाही खाणदानीच्या खाणाखुणा अंगावर जोपासत असलेला दाजीचा चौसोपी वाडा गावची पाठराखण करीत उभा होता. नदीकाठानं, थंडी, ऊन्हा, पावसात स्वतः खंबीरपणाने उभं राहून या वाडयानं गावचा विस्तार मात्र लेकरासारखा आपल्या पोटाशी वाढविला आहे.


गावात देशमुख मंडळींची आणखीही घरे आहेत. दोन वाण्यांची तर चार सहा ब्राम्हणांचीही घरे आहेत. कुणबी मंडळी तर याच गावात जास्त. होळीच्या मैदानातून उत्तरेकडे मारोतराव आबाचा वाडा. चोबीतकर मंडळींचा हा वाडा देशमुखांच्या वाडयापेक्षा लहान आहे. परंतू दोन्ही मंडळी सुखी संपन्न, समृध्दीत नांदलेली. लहानसहान शेतकरी तसेच गोरगरीब मंडळीही गावाचं वैभव आहे. होळीच्या मैदानात दगडाचया चिरेबंदीत अर्ध्यापर्यंत नाल्याच्या काठावर उभं असलेलं गायकवाडाचं पश्मिमुखी घर आहे. होळीचं मैदान गावच्या मध्यभागी आहे. या ठिकाणाहून सर्वच वस्ती केंद्रीभूत झालेली. या मैदानातच वाण्याचं घर आहे, लगतच लोहार मंडळींची घरं आहे. त्यालाच लागून मांगवाडा व त्याच्याच बाजूला महारवाडा चिकटून बसलेला आहे. होळीच्या मैदानातून निघून रस्ता मांगवाडयातून जरा चढण चढून स्टॅन्डवर येतो.


स्टॅन्डच्या पुढे सडकेच्या पलीकडे गावचे तत्कालीन ब्लॉक डेव्हलपमेंट अध्यक्ष कै. डॉ डी. एल. ठाकरे यांनी त्यांचे कारकिर्दीत वाठोडा गावातील या सडकेच्या पलीकडे नवी वस्ती निर्माण करण्याचा “ मास्टर प्लॅन ' राबवून जिथे स्मशान, उकिरडे, भराटीचे बन होते तिथे लेआऊट टाकून नवीन घरकूल देऊन तेसुध्दा लोकांचे नवीन वस्तीस्थान झाले. त्यालाच कुणी रामनगर तर कुणी प्लॉटवरची घरे म्हणूनही संबोधतात. किंवा कुणी याच भागाला बाभूळखेडा असंही म्हणतात. इथे आजही बऱ्याच घरांची वस्ती आहे. याच भागात ग्रामपंचायतीच्याच इमारतीत, डॉ. डी. एल. ठाकरे यांच्या प्रयत्नातून गावात सुरू

करण्यात आलेला दवाखाना उभा होता. पोष्ट, वीज महामंडळाचं ऑफीसही त्याच इमारतीत होतं. राजकारणापायी दवाखाना आता आमनेरला स्थित झालेला आहे. तर ग्रामपंचायतीनं स्वतंत्र इमारत बांधली आहे.


याच स्टॅन्डवरून कलालाच्या हॉटेलजवळून जाटपु-यातून निघून रस्ता दाजीच्या वाडयाकडे जातो. या टापूत कुणबी मंडळींची बव्हंशी घरे आहेत. होळीच्या मैदानाच्या पश्‍चिम दिशेस गढी व दाजीचा वाडा आहे. सुमारे एक दीड एकर जागेत पसरलेला हा वाडा दणकट बांधणीचा असल्यामुळेच आता आतापर्यंत समर्थपणे वादळवा-याशी झुंज देत डौलाने उभा होता. मात्र 1991 साली झालेल्या अतिवृष्टीमुळे भिंती खचून खिंडारं पडली. त्यापासून कोणताही धोका भविष्यात होऊ नये यासाठी भिंती पाडून घेतल्या आहेत.


गावावर दाजीचा शब्द हुकूमबर चालायचा, हुकूमशाही दाजींना तशी पटत नव्हतीच असं म्हणतात. मरीपण आदर म्हणून गावची मंडळी त्यांना प्रेमाने तसा मान द्यायची. त्यांचा शब्द गावकरी प्रमाण मानायचे. त्यांचा वाडा हा गावक-यांच्या सुख दुःखात सामील झालेला आहे. लहानसहान तसेच मोठे वजाघातही त्यानं मुक्या मनानं पचवले आहेत. हा वाडा देशमुख मंडळींच्या पिढया न्‌ पिढयांची खूण आहे.


पूर्वी देशमुख मंडळीचा पंचकोशीतल्या गावात मालगुजारी होती, मनसबदारी होती. ते राजयोगी आहेत. त्यांच्याजवळ भरपूर जमीन, भव्य दिव्य कारभार आणि तो पाहण्यासाठी योजलेली लायक अशी मंडळी होती. सर्व कामे नेटाने आणि सुव्यवस्थितपणे चालायची.


दाजींचा कारभार मारोतराव आबांच्या तुलनेत कितीतरी मोठा. आबाजवळही जमीन जुमला, कारभारी, गायी, बैल असंच सर्व काही होतं. आबांच्या वाडयाच्या पूर्वेलाच त्यांची जमीन लागून होती. वाड्याला लागूनच पश्‍चिमेकडे चोबीतकर मंडळींचा बंदा मोहल्ला आहे. पूर्वी तिथे कृष्णराव चोबीतकर यांची पिठाची गिरणी होती. गिरणीवर बकाराम आबा नेहमीच असायचा. गोरा गोमटा बकाराम आबा बच्चेमंडळींची टिंगल टवाळी उडवायचा. त्याच्याशी खेळण्यात मजा यायची. मोहल्ल्याच्या खाली पाटलाचा वाडा. त्यालाच लागून कुणब्यांची वस्ती. गणपत चोबीतकाराच्या घराजवळून पाय-या उतरून फरस ओलांडून रस्ता चिंचेजवळून सरळ कुमाजीबावाच्या डोहाकडे सरकतो. याच रस्त्याला लागून उंच टेकडं चढत गेल्यासारखी घरे टेकाडावर वसली आहे.


चोबीतकर आबाच्या वाडयाच्या मागच्या बाजूने उत्तरेकडे भुसारी मंडळीची घरे आहेत. आता तिथे प्लॉट पडून वस्ती झाली आहे. ती घरे गावाची मर्यादा स्पष्ट करतात. या घरांना लागूनच दाजींच्या व आबांच्या जमिनीचा विस्तार प्रसरण पावलेला. शहराची हवा लागून आता गावातही प्लॉट पडून गावही दिवसेंदिवस ऐसपैस होत आहे.


होळीच्या मैदानातून वायव्यकडे सरकले की, भुजाठे आबांचं घर लागतं. मध्यंतरी ते गुरासाठी गोठा म्हणून वापरात होतं. त्यालाच लागून हिवसे गुरूजींचं घर. उजव्या अंगाला खाडे मंडळींचा मोहल्ला. पुढे रस्त्याच्या डाव्या अंगाला पण दाजींच्या वाडयाला खेटूनच ब्राम्हण मंडळींची घरे, त्यालाच लागून ढोबळे, फाटे आणि दुस-या अंगाला बोकडे मंडळींची घरे, तिथेच जवादे, बारस्कर, उपासे, ठाकरे आदींची घरेही होती.


ब्राम्हण मंडळींच्या घरासमोरून मुसळखेडयाकडे उतरत समोर गेलेला फरसबंदीचा हा रस्ता खाली उतरताना त्याच्या कडेवर पाटणकर मंडळीचं मोठं घर होतं. रॉबीन नावाचा कुत्रा होता. त्याच्यचा खूप काही गोष्टी आहे. त्यालाच लागून सोनार मंडळींचीही घरे आहेत. या रस्त्यावर खुलणारं एकटंच दार आहे दाभडे आबाचं


हाच रस्ता पुढे दोन फाटयात विभागतो. एक मुसळखेडयाला तर दुसरा ब्राम्हण मंडळींच्या शेतातून नदीवर जातो. नदीकाठचं ते शेत गावाला शार म्हणूनच परिचित आहे. त्यात चिंच, ओबा, आवळी अशी मोठमोठी झाडं होती. हा शार गावापासून थेट महादेव पिंडीपर्यंत पसरला आहे, तर भुजाडे आबांच्या शेताला लागून शारात काही गुरांचे गोठे आणि काहींची राहूटीही तिथं होती आता मात्र तशी ती ओसाड वस्ती. शारातून चिंचेखालून वाहत येऊन नदीत उतरणा-या नाल्याच्या काठानं गोद्री फोफावलेली. तर फरसबंदी उतरून सरळ वडाखालून मुसळखेडयाकडे जाणारा. याच्या डाव्या अंगाला भुजाठे आबाची मसानी तर उजव्या अंगाला दाजींची जमीन. याच उंच कडेला वडाचं भलंदांडगं एक जुनं जीर्ण म्हातारं वडाचं झाड. तेवढं मोइं झाड आज पंचकोशीतही दिसत नाही. ते इतकं उंच असलं तरी आजही आपल्या पारंब्यानी जमिनीवर उतरून तिला नमन करीत आहे. आपल्या अवाढव्य शरीराचा भार दिमाखाने मिरवत उभं असलेलं हे झाड गावच्या आठ दहा पिढयांचं साक्षी राहिलं आहे. या झाडापासूनच दाजींच्या जमिनीचा विस्तार जणू या पारंबीसारखाच वाढलेला.


हाच रस्त्या आपल्याला पुढे मुसळखेडयाला घेऊन जातो. तिथं नदीकाठावर यशवंत महाराजांचं मंदिर आहे. दहा बारा ६ रांच्या वस्तीचं हे गाव. तिथंही पाटील मंडळींचाच बोलबाला जास्त. काही इतर मंडळींची घरेही आहेत. इथूनच रस्ता पुढे सावंगी गावाला जातो.


नदीच्या अल्याड आणि पल्याड असणा-या दोन्ही गावचे हितसंबंध एकमेकांत गुंतलेले आहेत. दोन्ही गावात अनेक वाडे आणि देशमुखी असली तरी पंचकोशीत दबदबा दाजींचाच होता. दोन्ही गावानं आपली स्वतंत्र अभिवृत्ती जपलेली आहे. गावात विविध जाती जमातींची लोकं एकत्र नांदतात. त्यात बव्हंशी कुणब्याचींच घरे आहेत. सोबतीला चार सहा वाणी ब्राम्हणांचीही घरे आहेत. चार पाच न्हाव्यांची तर चार सहा गोवारी समाजाचीही आहेत. मांगवाडा आणि महारवाडा स्वतंत्र असला तरी कुणबी वस्तीला चिकटूनच. गावात फक्त एकच, शीख समाजाचं घरं होतं आता एका घराची त्यांचीही अनेक घरे झाली असली तरी ते अजूनही एकसंधच आहे. मुस्लीम समाजाचं घर गावात नाहीच.


1991 च्या पुरानं गावाला जो तडाखा दिला त्याच्या आठवणी मनाशी घोळवत असलेल्या गावाचं आता नागपूरकडे जाणा-या रस्त्यावर पुनर्वसन झालेलं आहे. नागपूरकडे जाणारा हा राजमार्ग पूर्वी नाकात दम आणणारा होता. आमनेर ते वरुडपर्यंतचा जुना मार्ग शिवारातील बोरंगातून जात होता. या रस्त्यासाठी ज्या पध्दतीने होईल त्या पध्दतीने लोकसहभागातून शेतीचे पट्टे दान करून करण्यात आला. गावच्या शेतकऱ्यांनीसुध्दा या रस्त्यासाठी जमिनी दिल्यात. आज त्याचे स्वरूप वरुड - नागपूर महामार्गात झालेले आहे. याच रस्त्याच्या बाजूनेही वस्ती पुनर्वसनाला समांतर होत आता माह्यरूखाच्या शाळेपर्यंत विस्तार पावलेली.


या मातीचा टिळा ज्यांच्या माथी लागला त्यांची ललाटरेषा उजळून निघालेली आहे. याची उदाहरणेही खूप बोलकी आहेत. त्या सर्वांनी या गावाला आणि गावच्या मातीला वैभवाचे दिवस आणले आहेत. परंतू त्या सर्वांचा इथे उहापोह करायचा झाल्यास ते एक स्वतंत्र प्रकरणच होईल.


अशा या मातीचा टिळा आपल्याही माथी लागलेला आहे, ही खूप मोलाची गोष्ट वाटते.

 

- प्रमोद बाबुराव चोबीतकर

 

Comments


bottom of page